बिहार निवडणुकीत भाजपच्या पराभवावरून पक्ष श्रेष्ठींवर टीका केल्याने कारवाई होण्याच्या चर्चेची शत्रुघ्न सिन्हा यांनी खिल्ली उडवली आहे. माझं तोंड बंद करणं तर सोडाच; मला साधं फटकारण्याची कुणात हिंमत अथवा तसा डीएनए कोणातही नाही, असे ट्विट सिन्हा यांनी केले आहे.

बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती. पक्ष नेतृत्त्वावरील टीकेमुळे शत्रुघ्न यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तवली जात असतानाच आता सिन्हा यांनी पुन्हा एकदा एकामागोमाग ट्विट करून मोदी आणि शहांवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला आहे. सामूहिक जबाबदारीची ढाल पुढे करून आता चालणार नाही. झालेल्या चुका सुधारायच्या असतील तर पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीवरच टाकली पाहिजे आणि संबंधित व्यक्तीनेच त्याची उत्तरे दिली पाहिजेत, असे सिन्हा म्हणाले आहेत. काही समज नसलेल्या लोकांना कारवाईची गोष्ट करणं शोभत नाही. या केवळ पोकळ धमक्या आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

यापूर्वी शत्रुन्ह सिन्हा यांनी मोदी-शहा या जोडगोळीच्या पक्षावरील वर्चस्वाला आव्हान देत ‘खऱ्याला खरे म्हणणे ही जर बंडाळी असेल तर मी बंडखोर आहे,’ असे ठासून सांगितले होते. दिल्ली, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात पक्षाचा पराभव झाला तेव्हा अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी बोलले होते. त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. आता मी एक ‘गरीब आणि शरीफ’ तेवढा कारवाईसाठी उरलो काय? असा सवाल करून संभाव्य पक्ष कारवाईबाबत देखील त्यांनी भाष्य केले होते.