राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मात्र काँग्रेसने हा कार्यक्रम भाजपाप्रणित आहे तसंच निवडणुकीसाठी केला जातो आहे असं म्हटलं आहे. तसंच चारही पीठाच्या शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला येणार नसल्याचं कळवलं आहे. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चारही पीठाच्या शंकराचार्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. प्रभू रामचंद्रांपेक्षा कुणीही मोठं नसतं असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी आदित्यनाथ यांनी काय आवाहन केलं आहे?

“राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांनी सहभागी झालं पाहिजे. आम्ही त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. आज जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही. मी असेन, देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य कुणीही रामापेक्षा मोठं नाही. प्रभू रामचंद्रांपेक्षा मोठं कुणीही नाही. प्रत्येक माणसाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. त्यांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. त्यांनी जरुर या सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे”, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणखी काय म्हणाले?

“आम्ही कुठल्याही आमंत्रणाला नकार दिलेला नाही. कारण वस्तुस्तिथी ही आहे की आम्हाला अजून आमंत्रणच मिळालेलं नाही. त्यामुळे आमच्यावर हा आरोप होऊ शकत नाही की आम्ही राम मंदिरातल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण धुडकावलं. राम मंदिर ट्रस्टने आम्हाला निमंत्रण, आमंत्रण का दिलं नाही तो त्यांचा प्रश्न आहे. इतर तीन पीठांना आमंत्रण मिळालं आहे की नाही हे मला ठाऊक नाही. आम्हाला आमंत्रण मिळावं अशी अपेक्षा आम्ही करत नाही. आम्हाला आमंत्रण मिळालं तरीही आम्ही त्या सोहळ्याला जाणार नाही” असं अविमुक्तेश्वरनंद यांनी म्हटलं आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

मंदिर म्हणजे देवाचं रुप

“मंदिर हे देवाचं रुप असतं. देवाचं शरीर म्हणजे मंदिर आणि मूर्ती म्हणजे देवाचा आत्मा. त्यातला कळस हे देवाचं शीर आहे. आता शिखर म्हणजेच देवाचे डोळे तेदेखील तयार झालेले नाहीत. पायापासून ते कळसापर्यंत देवाच्या अंगांची प्रतिष्ठापना केली जाते. चेहरा, कळस हे काहीही तयार झालेलं नाही. फक्त धड तयार आहे त्यात प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं आहे. ही कुठलीही सामान्य चूक नाही. असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.” मात्र आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी रामापेक्षा कुणीही मोठं नाही. सगळ्यांनी आमंत्रण स्वीकारुन राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला आलं पाहिजे असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No one is bigger than lord ram i request all the four shankaracharyas to attend the pranpratishtha ceremony said yogi adityanath scj
Show comments