अमरनाथवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून कोणीही राजकारण करू नये. मात्र, सरकारला आज ना उद्या या हल्ल्यामुळे उपस्थित झालेल्या अनेत प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील, असे एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. आम्ही लष्कर आणि आयएसआयचा हेतू कधीही सफल होऊ देणार नाही. भारतातील जनतेमध्ये एकता आहे. काल झालेला हल्ला अत्यंत घृणास्पद होता, असे ओवेसी यांनी म्हटले.

काल या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणारे काश्मीर आणि काश्मिरीयतचे शत्रूच आहेत. काश्मिरी जनतेने अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा निषेधच केला पाहिजे. निष्पाप यात्रेकरुंची हत्या करणे निषेधार्हच आहे. हे ट्विट करताना त्यांनी नॉट इन माय नेम (#NotInMyName) हा हॅशटॅगही वापरला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी केली होती.

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जण ठार झाले. बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले घडवले. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक हे महाराष्ट्रातील पालघरचे आहेत. जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी आज जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे. दहशतवादी हल्ल्यात पालघरच्या डहाणूमधील रहिवाशी निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर यांचा मृत्यू झाला आहे. भाविकांची ही बस गुजरातच्या वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज तातडीची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारत अशा भ्याड हल्यांपुढे आणि द्वेषमुलक कृत्यांपुढे कधीच झुकणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.