जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेषाधिकारामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला अथवा राज्याच्या विशेष घटनात्मक दर्जाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही राहणार नाही, असा इशारा राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला. राज्याला मिळालेल्या विशेषाधिकावरील हल्ले योग्य नाहीत. याबाबत कोणत्याही प्रकारचा समझोता होऊ शकत नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटनेतील अनुच्छेद ३५ अ रद्द करण्यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ३५ अ नुसार जम्मू-काश्मीरमधील आमदार आणि खासदारांना विशेष सवलती देण्यात येतात. घटनेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. काश्मीरप्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. विशेषाधिकारांवर हल्ले करून या हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा करायचा नाही, असंही त्यांनी सुनावलं.

अनुच्छेद ३५ अ आणि कलम ३७० वर हल्ले करून फुटीरतावाद्यांचं नुकसान होईल, असं काहींना वाटतं. पण ते साफ चुकीचं आहे. विशेषाधिकार संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणारे लोक भारताच्या कायम सोबत असणाऱ्या आणि निवडणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना कमकुवत करण्याचं काम करत आहेत, असंही त्या म्हणाल्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात सामान्य लोकांचं नुकसान होत आहे. गेल्या ७० वर्षांपासून असंच होत आहे. दारुगोळा आणि अधिक सैन्य तैनात करून काश्मीर प्रश्नावर तोडगा निघू शकत नाही. काश्मिरी जनतेच्या गरजा सरकारनं लक्षात घेतल्या पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या.

माझ्यासाठी इंदिरा गांधी म्हणजेच भारत

यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं. तसंच यावेळी त्यांनी माझ्यासाठी भारत म्हणजेच इंदिरा गांधी आहेत, असं सांगितलं. काही वाहिन्यांवर ज्या पद्धतीनं भारताबाबत सांगितलं जातं, पसरवलं जातं त्यामुळं मी नाराज आहे असंही त्या म्हणाल्या. भारत आणि काश्मीरमध्ये आणखी दरी निर्माण होत आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान भारताबद्दल जे बोललं जातं त्या भारताबाबत मला काहीच माहिती नाही, असंही त्या म्हणाल्या. मी जेव्हा लहानाची मोठी होत होती. त्यावेळी त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं. काही लोकांना ते आवडत नाही. पण माझ्यासाठी इंदिरा गांधी याच भारत होत्या, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No one will shoulder indian flag in jammu kashmir if special status is tampered warns mehbooba mufti