भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मंगळवारी झालेल्या भेटीचे फलित शून्य असल्याची खंत अनेक पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. सार्क राष्ट्रप्रमुखांना आपल्या शपथविधी सोहळ्यास आमंत्रण देऊन मोदी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपली प्रतिमा उज्ज्वल केली असली तरीही त्यातून काहीही विशेष हाती लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याचे आक्षेपही काही पाकिस्तानी वृत्तपत्रांनी नोंदवले आहेत.
पाकिस्तानातील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘द डॉन’ने ‘पाक इंडिया : मोअर ऑफ द सेम’ या शीर्षकाचे संपादकीय लिहिले आहे.
मोदी यांनी निवडणूकपूर्व प्रचारादरम्यान उभयदेशांमध्ये व्यापारी संबंध वाढीस लागावेत म्हणून विशेष प्रयत्न करण्याविषयी म्हटले होते. मात्र त्याहूनही अधिक महत्त्वाच्या असलेल्या ऐतिहासिक आणि संरक्षणविषयक संबंधांकडे काणाडोळा करण्यात आला, असा आक्षेप या संपादकीयात घेतला गेला आहे.
भारतीय अधिकाऱ्यांच्या वक्तव्याने संभ्रम
मोदी-शरीफ भेटीच्या तपशिलाची माहिती पुरविताना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी जाहीररीत्या केवळ दहशतवादाच्याच मुद्याचा उल्लेख केल्यामुळे उभयपक्षीय संबंधांमध्ये असलेली दरी सध्या तरी कमी होण्याची चिन्हे नाहीत. पाकिस्तानला आर्थिक मुद्यांवरून उभयपक्षीय संबंध सुधारावेत असे वाटत आहे, मात्र सध्याची वाटचाल त्या दिशेने होत असल्याचे दिसत नाही, अशी खंतही या विशेष संपादकीयात व्यक्त करण्यात आली आहे.
सदिच्छा की केवळ ढोंग?
उभय राष्ट्रांमधील संबंध सुधारावेत अशी मोदींची खरोखरीच इच्छा आहे का, असा सवाल उपस्थित करत सार्क राष्ट्रप्रमुखांच्या भेटीने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपली प्रतिमा उजळ करणाऱ्या मोदींनी या भेटीतून फारसे काही हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती, असा आरोपही ‘द डॉन’ने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे समपदस्थ नवाझ शरीफ यांच्या भेटीत शरीफ यांनी काश्मीर प्रश्न उचलून धरला. चच्रेची फलश्रुती अपेक्षेपेक्षा खूपच चांगली आहे.
सरताज अझीज , शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र कामकाज सल्लागार