पठाणकोट हवाई हल्ल्याच्या संयुक्त तपासांतर्गत पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हवाई तळाला भेट देण्यास संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. तळावरील घटना घडलेला परिसर लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त करण्यात आला असून तो तपासणीच्या अनुषंगाने सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात दिला असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले. स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांची पहिली तुकडी (स्क्वॉड्रन) या अथवा पुढील वर्षी स्थापन केली जाणार असल्याचेही पर्रिकर यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातील नाकेरी बेतुल येथे सोमवारी ‘डिफेक्स्पो’ या पायदळ, नौदल व अंतर्गत सुरक्षेशी संबंधित सामग्री व उपकरणांचे प्रदर्शन सुरू झाले. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना पर्रिकर यांनी पठाणकोट हल्ल्याच्या तपासासह इतर अनेक विषयांवरही मत व्यक्त केले. रखडलेला राफेल विमान खरेदीचा विषय लवकरच मार्गी लावण्यात येईल, हे नमूद करतानाच स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिहंत पाणबुडी कधी दाखल होईल, यावर त्यांनी आपल्या गरजांबाबत संरक्षण विभाग संवेदनशील असल्याचे यावेळी सांगितले.

लष्करी सामग्री खरेदीचे नवीन धोरण जाहीर
नाशिक : लष्करी सामग्री खरेदीच्या धोरणात आमूलाग्र बदल करून २०१६ चे नवीन धोरण जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे देशातील उद्योगांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला. दक्षिण गोव्यातील नाकेरी बेतुल येथे सोमवारी ‘डिफेक्स्पो’ या पायदळ, नौदल व अंतर्गत सुरक्षेशी संबंधित सामग्री व उपकरणांचे प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

Story img Loader