संसदेचे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी गुरुवारी स्पष्ट केले. लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेणे, हेच आमच्यासाठी प्राधान्याचे काम असून, संसदेमध्ये इतरही महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा व्हावी, असेच सरकारला वाटत असल्याचे ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र, तेलंगणा, मुझफ्फरनगरमधील दंगल पीडितांच्या पुनर्वसन शिबिरांमध्ये बालकांचा झालेला मृत्यू आणि महागाई या विषयावर विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज रोखले गेले आहे. सदस्यांच्या घोषणाबाजी आणि गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागते आहे. हिवाळी अधिवेशनाच्या नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारी लोकपाल विधेयकावर राज्यसभेत चर्चा होणार आहे.
सरकार शुक्रवारपासून संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यावर विचार करीत आहे का, असे विचारल्यावर कमलनाथ म्हणाले, सरकारचा सध्यातरी असा कोणताही विचार नाही. आम्ही कामकाजाची रुपरेषा निश्चित केली आहे आणि प्राधान्यक्रमही ठरवले आहेत. लोकपाल विधेयक हेच आमचे प्राधान्य आहे. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर होणे आवश्यक आहे.