सध्या तरी भाजप सोडण्याचा विचार नसला तरी याच पक्षात राहणार की नाही हे काळच ठरवेल असे सूचक विधान अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीमुळे वादळ उठले असताना भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपले स्पष्टीकरण दिले.
बॉलीवूडमधील शॉटगन अर्थात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमार यांच्यासोबत ‘चाय पे चर्चा’ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार दौ-यात जदयू व नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली असतानाच शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या जदयूत जाण्याचा कोणताही विचार नाही, पण भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.   नितीश यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांतूनच आमची भेट झाली. त्यावरून एवढे काहूर माजवण्याची गरज नसल्याचे त्यांनी टीकाकारांना यावेळी सुनावले.
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा जेडीयूत येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असं विधान करून नितीश यांच्या पक्षाने भाजपच्या चिंतेत भर टाकण्याचे काम केले आहे.

Story img Loader