‘आपला परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नाही, तर १२५ कोटी भारतीयांची आहे,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा आरंभ केला. हाती झाडू घेत दिल्लीतील एका वस्तीत साफसफाई करणाऱ्या पंतप्रधानांनी ‘वर्षांतून १०० तास सार्वजनिक स्वच्छतेसाठी देईन,’ अशी शपथ देशवासियांकडून वदवून घेतलीच; पण त्याचबरोबर देशातील नऊ नामांकीत व्यक्तींना ‘चॅलेंज’ देत सेलिब्रिटींनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले.
अमेरिका दौऱ्यावरून बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी साडेसात वाजता राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी थेट दिल्लीतील वाल्मिकी वस्ती गाठून बिर्ला मंदिरासमोर साफसफाई सुरू केली. खुद्द मोदी यांनीच हातात झाडू घेतल्याने उपस्थितांमध्ये कमालीचा उत्साह संचारला. नजीकच्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकासही मोदी यांनी अचानक भेट दिली.
तेथून राजपथावर पोहोचल्यानंतर त्यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा आरंभ केला. शेकडो विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वच्छ भारताचे महत्त्व पटवून सांगितले. ‘या अभियानात राजकारण नाही, देशभक्ती आहे. माझ्याआधी येणाऱ्या अनेक सरकारांनी स्वच्छतेसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले. त्यामुळे कोणीही या मोहिमेचा संबंध राजकारणाशी जोडू नये,’ असे आव्हान मोदी यांनी केले. यावेळी उपस्थितांना त्यांनी स्वच्छतेची शपथ दिली. ‘आम्ही आठवडय़ातून दोन तास व वर्षांतून १०० तास स्वत:हून स्वच्छतेचे काम करू. आम्ही स्वत: कचरा करणार नाही व दुसऱ्यांनाही करू देणार नाही,’ अशी शपथ त्यांनी यावेळी दिली. ‘स्वच्छ भारता’च्या या चळवळीत गुरुवारी सारेचजण उत्साहाने सामील झाली. सरकारी सुटी असूनही केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी मंत्रालये, कार्यालयांमध्ये सकाळी साडेदहा वाजता सर्व कर्मचारी हजर होते. कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे ‘स्वच्छता शपथ’ घेतली.
’स्वच्छता अभियानाचे दूत म्हणून मोदी यांनी नऊ जणांची नावे घोषित केली. त्यात सिने अभिनेता अमीर खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा, कमल हसन, भारतरत्नने सन्मानित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी व काँग्रेस नेते शशी थरूर यांचा समावेश आहे.
’केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी २० लाख रुपये वार्षिक निधी देण्याची घोषणा केली. तर या संपूर्ण मोहिमेसाठी दोन लाख कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. ’स्वच्छता अभियानाचे दूत म्हणून मोदी यांनी नऊ जणांची नावे घोषित केली. त्यात सिने अभिनेता अमीर खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा, कमल हसन, भारतरत्नने सन्मानित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी व काँग्रेस नेते शशी थरूर यांचा समावेश आहे.
’केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी २० लाख रुपये वार्षिक निधी देण्याची घोषणा केली. तर या संपूर्ण मोहिमेसाठी दोन लाख कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No politics only swachh bharat prime minister narendra modi