येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना प्रचाराच्या मुख्य प्रवाहात आणू नये, याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांकडून आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे भारतीय जनता पक्षाने गुरुवारी स्पष्ट केले. त्याचवेळी आघाडीचे राजकारण करण्याचे आमच्यावर कोणतेही बंधन नसल्याचेही पक्षाने म्हटले आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, जरी आम्ही आमच्या मागील सत्ताकाळात आघाडीचे राजकारण करून विश्वासार्हता आणि स्थिरताही मिळवून दिली असली, तरी आघाडी करण्याचे आमच्यावर कोणतेही बंधन नाही. आम्ही आघाडीकडे एक धर्म म्हणून पाहतो.
शुक्रवारपासून गोव्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्वी यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. येत्या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आणखी घटक पक्षांना सामावून आघाडी आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाईल. यासंदर्भात योग्यवेळी पत्रकारांना माहिती दिली जाईल, असेही नक्वी यांनी सांगितले.

Story img Loader