ढाका : बांगलादेशमध्ये अटकेत असलेले हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून, चितगाव न्यायालयात त्यांच्या जामिनावर आता २ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी कोणताही वकील पुढे येत नसल्याने न्यायालयाने जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दास यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र, त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले नाही. सुनावणीवेळी चितगाव न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दास यांचे प्रतिनिधित्व करणारा कुठलाही वकील नसल्यामुळे सत्र न्यायाधीशांनी जामीन अर्जावरील निकालासाठी पुढील तारीख दिल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. राजकीयदृष्ट्या प्रेरित वकिलांच्या गटांच्या धमक्यांमुळे दास यांना कुठलाही वकील मिळाला नसल्याचा दावा त्यांचे सहकारी स्वतंत्र गौरंग दास यांनी केला आहे.

हेही वाचा >>> भारत-चीन संबंधात थोडीफार सुधारणा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे लोकसभेत निवेदन

ब्रिटनकडून चिंता व्यक्त

लंडन : बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांवर आणि हिंदू नेत्याच्या अटकेवर ब्रिटनने मंगळवारी चिंता व्यक्त केली. मजूर पक्षाचे खासदार बॅरी गार्डिनर यांनी याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला. हिंद-प्रशांत भागासाठीच्या परराष्ट्र खात्याच्या मंत्री कॅथरिन वेस्ट यांनी सांगितले, की बांगलादेशमधील गेल्या महिन्यामधील भेटीत हंगामी सरकारने अल्पसंख्याकांसाठी मदत उपलब्ध असल्याची माहिती आपल्याला दिली आहे. ढाक्यामध्ये सर्वप्रथम येऊन प्रा. युनूस यांच्याशी ब्रिटनने संवाद साधला आणि अल्पसंख्याकांबरोबर असल्याचे कृतीद्वारे दाखवून दिले. बांगलादेशमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत.

भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घालावी

भारतीय वृत्तवाहिन्यांवर बांगलादेशात बंदी घालावी, अशा मागणीची याचिका बांगलादेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वाहिन्यांवर प्रक्षोभक वृत्ते प्रसारित होत असल्याचा दावा त्यात केला आहे. वकिल इखलास उद्दिन भुईयाँ यांनी याचिका दाखल केली आहे.

हजारो आंदोलकांची निदर्शने

आगरतळा : त्रिपुरामध्ये चिन्मय दास यांच्या हजारो समर्थकांनी मंगळवारी दास यांच्या सुटकेसाठी निदर्शने केली. ‘सनातनी युवा’ अंतर्गत हा मोर्चा काढण्यात आला. निदर्शक आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No relief to hindu leader chinmoy krishna das who arrest in bangladesh zws