मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याचा मृतदेह पाकिस्तानात आणावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेली नाही, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात कसाबला फासावर लटकविण्यात आले. कसाबचा मृतदेह पाकिस्तानात आणावा, अशी मागणी करणारा अर्ज त्याच्या कुटुंबीयांकडून प्राप्त झालेला नाही, असे परराष्ट्र व्यवहार विभागाच्या संसदीय सचिव पालवाशा खान यांनी दुपारी नॅशनल असेंब्लीत स्पष्ट केले.
कसाब हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानाच रचला गेल्याचे पाकिस्तान सरकारने यापूर्वीच मान्य केले आहे.पाकिस्तानने गेल्या जानेवारी महिन्यापासून काही मच्छीमारांसह ७८३ कैद्यांची सुटका केली आहे, असेही खान यांनी सांगितले. भारतातून पाकिस्तानी कैद्यांची मुक्तता करण्यात सरकारला ‘अनेक समस्या’ भेडसावत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. भारतीय सरकारसमवेत हा मुद्दा आम्ही प्रत्येक व्यासपीठावर उपस्थित केला आहे, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनाह यांची लंडनमधील निवासी इमारत खरेदी करण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करण्यात आलेला नाही. ती मालमत्ता एका खासगी व्यक्तीच्या मालकीची असून त्याची विक्री करण्यासाठी सरकारला त्यांच्यावर दबाव आणावयाचा नाही, असेही त्या म्हणाल्या.     
मेड इन पाकिस्तान ‘कैदी’
पाकिस्तानचे एकूण ८७१५ नागरिक परदेशातील विविध तुरुंगात असून त्यापैकी सौदी अरेबियात २३७३, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १३३४, इंग्लंडमध्ये १४१६, भारतात ४०३, अफगाणिस्तानात ३५० आणि अमेरिकेत ९९ आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

Story img Loader