युद्धाची भाषणे करणारे पाकिस्तान माझ्या हयातीत भारताविरोधात युद्ध जिंकण्याची कोणतीही शक्यता नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला बुधवारी सुनावले.
भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये काश्मीर हाच कळीचा मुद्दा आहे. तसेच याच मुद्दय़ावरून अण्वस्त्रे असलेल्या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी चौथे युद्ध होण्याची दाट शक्यता आहे, असे स्फोटक वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केल्याचे वृत्त देशाचे मुख्य वृत्तपत्र असलेल्या डॉनमध्ये देण्यात आले आहे. या वृत्ताची भारताने गंभीर दखल घेतली आहे. पाकिस्तान युद्धाची भाषा करीत असून माझ्या हयातीत पाकिस्तानला युद्ध जिंकण्याची कोणतीही संधी नाही, असे पंतप्रधानांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये शरीफ यांचे स्फोटक वक्तव्य प्रसिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानने सारवासारव केली आहे. भारताशी असलेले वाद शांततेने आणि चर्चेने सोडविण्यावर पाकिस्तानचा भर असून, पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कोणतेही आक्रमक वक्तव्य केलेले नाही, असेही पाकिस्तानने स्पष्ट केले.

Story img Loader