पूरग्रस्त उत्तराखंडमध्ये पाणी, अन्न अथवा हवेतून होणाऱ्या विषाणूसंसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केले.
हरिद्वार (अल्वालपूर), उत्तरकाशी (उदवी) आणि रूद्रप्रयाग (चंद्रपुरी) या भागांत अतिसाराची लक्षणे आढळताच तातडीने उपचार केले गेले. त्यानंतर कुठेही साथीच्या आजाराची लक्षणे आढळलेली नाहीत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. उत्तराखंडमध्ये आरोग्य विभागाची पथके सातत्याने फिरत आहेत आणि लक्ष ठेवून आहेत, असेही नमूद करण्यात आले आहे.
उत्तराखंडमध्ये मंगळवारी हवाई दलाचे मदतकार्यासाठी निघालेले हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या २० जणांवर शुक्रवारी डेहराडूनमध्ये सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पुरामुळे सुमारे अडीच हजार घरे, १५४ पूल, ३२० रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. उत्तरकाशी, चामोली, रूद्रप्रयाग आणि गढवाल या चार जिल्ह्य़ांतील १६ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे.