पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतर तिसरी आघाडी स्थापन करायची असेल, तर त्यांना काँग्रेस किंवा भाजप यांचा पाठिंबा आवश्यक ठरेल असे लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पास्वान यांनी सांगितले.
पास्वान यांनी पीटीआयला सांगितले, की तिसरी आघाडी भाजप किंवा काँग्रेस यांच्या पाठिंब्याशिवाय उभीच राहू शकत नाही. पण ही आघाडी धर्मनिरपेक्ष असावी यासाठी ते भाजपचा पाठिंबा घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागेल. त्यामुळेच काँग्रेस व लोकजनशक्ती पक्ष यांना काँग्रेसशी आघाडी करायची आहे.
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगात आहेत असे सांगून ते म्हणाले की, २०१४ च्या निवडणुका लक्षात घेता यावर मित्र पक्षात गांभीर्याने चर्चा व्हायला हवी. आम्हाला काँग्रेस बरोबरची युती हवी आहे. सध्या आम्ही राजदबरोबर आहोत पण लालू तुरुंगात आहेत व निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात आघाडीबाबत गांभीर्याने चर्चा होणे गरजेचे आहे. पास्वान म्हणाले, की एखादा प्रश्न एकदाच सोडवावा लागतो. लोकजनशक्ती पक्षाच्या पुढील धोरणाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की आम्ही एकत्र बसून धोरण ठरवू. काँग्रेस काय चाल खेळते ते बघू. असे असले तरी काँग्रेस व आमची जुनी युती आहे व आम्ही ती गमावू इच्छित नाही. आम्ही प्रथम काँग्रेसशी बोलू व नंतर धोरण ठरवू.