वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीच्या निर्णयाचा कॉंग्रेस फेरविचार करणार नाही, असे पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. हा निर्णय घेण्यापूर्वी वायएसआर कॉंग्रेस आणि तेलगू देसम पक्ष या दोन्ही पक्षांना त्याबद्दल माहिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले.
वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी आणि तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी सहमती दर्शविल्यानंतरच केंद्र सरकारने वेगळ्या तेलंगणा राज्य निर्मितीचा निर्णय घेतला. आता या दोन्ही पक्षांनी आपल्या भूमिकांमध्ये बदल केलेला असला, तरी कॉंग्रेस आपली भूमिका बदलणार नाही, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
दिग्विजय सिंह हे पक्षाचे आंध्र प्रदेशमधील प्रभारी आहेत. वेगळ्या तेलंगणानिर्मिती संदर्भात पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचेच पालन केले जाईल, असेही त्यांनी राज्यातील पक्षाच्या नेत्यांना सांगितले.

Story img Loader