निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटाने लेखी युक्तिवाद दिला आहे. शिवसेनेच्या जे बाळासाहेब ठाकरेंनी ठरवून दिलेली घटना आहे त्याच घटनेनुसार आम्ही काम करत आहोत. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना झालेलं मतदान या सगळ्याचा विचार झाला पाहिजे असं आम्ही निवडणूक आयोगाला लेखी उत्तर दिलं आहे. तसंच कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडले होते त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे.
आम्ही बंड केलेलं नाही, उठाव केला आहे
आम्ही बंड केलेलं नाही, तर आम्ही उठावच केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचाच उठाव केला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि आमदारांच्या मनात ही भावना होती. ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलो त्यावरून आम्ही हा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने काय म्हटलं आहे ते त्यांना वाटत असेल ते म्हणत आहेत अशी भूमिका राहुल शेवाळे यांनी घेतली आहे. कुठलाही उठाव हा एका दिवसात, एका रात्रीत होत नाही. मतदारांनी जो कौल दिला त्याविरोधात आघाडी करण्यात आली होती. तसंच विविध घटना पुढे घडल्या त्यामुळे आम्ही उठाव केला असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेता पद घटनात्मक
एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेता पद हे घटनात्मक आहे हे आम्ही निवडणूक आयोगासमोर सांगितलं आहे. जी कायदेशीर बाजू आहे ती आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. पक्षातून बाहेर पडल्यावर घटना तुमच्यासाठी कालबाह्य कशी झाली असं विचारलं जातं आहे. त्यावरही राहुल शेवाळेंनी उत्तर दिलं. बाळासाहेब ठाकरेंनी जी घटना तयार केली होती ती वेगळी घटना होती आणि उद्धव ठाकरेंनी जी घटना तयार केली ती वेगळी आहे. त्यामुळे अरविंद सावंत काय आरोप करतात ते करू द्या आम्ही जुन्या घटनेप्रमाणेच एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवडलं आहे असंही राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं.
बाळाहेबांची शिवसेना योग्य मार्गावर
बाळासाहेबांची शिवसेना ही योग्य मार्गावर आहे. अरविंद सावंत यांना दोन घटना आहेत हे माहित नसेल. उद्धव ठाकरेंनी वेगळी घटना तयार केली होती. ही घटना जेव्हा तयार केली गेली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. एखादं बंड किंवा उठाव होतो तो काही एका दिवसात होत नाही. शिवसेना-भाजपाने एकत्र निवडणूक लढवली होती आम्ही सगळे निवडणून आलो होतो. पण महाविकास आघाडी निर्माण झाली त्यानंतर शिवसेनेतल्या आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना डावललं गेलं. अनेक गोष्टी अन्यायकारक घडल्या त्यामुळे आम्ही हा उठाव केला असंही राहुल शेवाळे यांनी सांगितलं.मतदारांनी जो आम्हाला आशीर्वाद दिला त्याचा सन्मान ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत पक्ष नेतृत्त्वाकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांच्या विरोधात हा उठाव करण्यात आला आहे असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.