देशातील सत्ता आणि पदे मूठभर लोकांच्या हाती केंद्रित झाली आहे. आमच्या देशात ज्ञानाचा आदर होत नाही. तुम्ही कितीही विद्वान असले तरी तुमची कदर होत नाही. ही या देशाची शोकांतिका आहे. त्यामुळेच देशातील युवक संतप्त आहेत, असे सूर काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे पक्षनेते आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना आळवले.
१२७ वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाची ताकद आणि वैगुण्यावरही बोट ठेवले आणि पक्ष संघटना नियम आणि कायद्याने चालली पाहिजे, असा आग्रह धरला. काँग्रेस हा राजकीय पक्ष नव्हे, तर भारतातील आणि जगातील सर्वात मोठा परिवार आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या आठ वर्षांपासून पक्षात काम करीत असताना आपल्याला बुजुर्ग आणि नवोदितांकडून बरेच शिकायला मिळाले, असे सांगून पक्षात स्वत: मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी स्वीकारत असताना फक्त तरुणांनाच प्राधान्य दिले जाणार नाही, तर बुजुर्गाचाही आदर केला जाईल, याची ग्वाही त्यांनी दिली. कोणतेही काम विचारपूर्वक, सखोलपणे आणि मुळीच घाई न करता करायचे आहे, असे त्यांनी बजावले. काँग्रेस पक्षात पद्धतशीरपणे नेतृत्वाचा विकास करून देशाचा आणि राज्यांचा कारभार चालवू शकतील असे ४०-५० नेते प्रत्येक राज्यात घडायला हवेत, असे ते म्हणाले. निवडणुकांच्या तिकिटांचे दिल्लीतून होणाऱ्या वाटपावरही त्यांनी टीका केली. निवडणुकीपूर्वी दुसऱ्या पक्षांतील लोक काँग्रेसमध्ये येतात. काँग्रेसच्या तिकिटावर लढून निवडणूक हरतात आणि पक्ष सोडून जातात. ही स्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. नेत्यांचा आणि सामान्य कार्यकर्त्यांचा पक्षात आदर झाला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader