अमेरिका-मेक्सिको भिंतीसाठी निधी देण्यास डेमोक्रॅटिक पक्षाचा नकार

अमेरिका-मेक्सिको भिंत बांधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ५.७ अब्ज डॉलरच्या निधीचे वाटप करण्यास नकार दिल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमधील बैठकीतून तरातरा निघून गेले. त्यामुळे ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षामध्ये टाळेबंदीबाबत होणारी चर्चाच होऊ शकली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रागारागाने टेबलावर हात आपटले आणि ते बैठकीतून तरातरा निघून गेले. टाळेबंदी उठवावी, या विनंतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे. बेकायदेशीरपणे करण्यात येणारे प्रवेश हा बैठकीतील कळीचा मुद्दा होता.

अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी प्रचाराच्या वेळी दिले होते. या भिंतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यास डेमोक्रॅटिक पक्षाने विरोध केला आहे. सदर भिंतीचे कामकाज खर्चीक आहे आणि त्यामुळे काहीही परिणाम होणार नाही, असेही पक्षाचे म्हणणे आहे. सीमेवरील भिंतीसाठी निधी देण्यास मेक्सिकोने नकार दिला आहे. अमेरिकेमध्ये १९९५-९६ मध्ये २१ दिवस टाळेबंदी करण्यात आली होती. आताच्या टाळेबंदीचा बुधवारी १९ वा दिवस होता.

Story img Loader