भारताला सर्वच देशांशी शांततेचे आणि सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत, मात्र याचा अर्थ भारत राष्ट्र म्हणून कमकुवत आहे असा घेऊ नये, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. तसेच जेव्हा-जेव्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग होईल तेव्हा-तेव्हा चोख प्रत्युत्तर देण्यास कचरू नका, अशी सूचनाही त्यांनी जवानांना केली.
पाकिस्तानकडून गेल्या तीन आठवडय़ांत २३ हून अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग झाला आहे. आम्ही १५ वेळा शांततेचे निषाण त्यांना दाखवले मात्र, त्यांच्याकडून गोळीबार थांबला नाही, असे सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी आपल्याला सांगितले. मात्र असे हल्ले होत असताना ‘शांततेचे पांढरे निषाण’ फडकावत बसू नका. जर अशा घटना वारंवार होत असतील तर त्याला चोख प्रत्युत्तर द्या, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा सुरक्षा दलास बजावले. हरयाणा येथे विजय संकल्प यात्रेमध्ये ते बोलत होते.गेल्या दहा वर्षांच्या काँग्रेसच्या कार्यकाळात भारत हे एक दुबळे राष्ट्र असल्याची प्रतिमा जगभरात तयार झाली आहे, मात्र आता ती बदलण्याची गरज आहे. चोख प्रत्युत्तर देण्याची आपल्या देशाची क्षमता आहे हे जगाला कळऊ द्या, असे आवाहान राजनाथ यांनी केले.
 

Story img Loader