Women Minister in Karnataka Cabinet : कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार विराजमान झाले आहेत. त्यांचं पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळही ठरलं असून यामध्ये आठ मंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेसने निवडणूक प्रचारात महिला योजनांवर भर दिला होता. परंतु, त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने अनेक स्त्रीवाद्यांनी नारीज व्यक्त केली आहे.
काँग्रेसने गृह ज्योती, गृहलक्ष्मी आणि उचित प्रयत्न आदी तीन योजना महिलांसाठी आणल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात केलं होतं. तसंच, प्रचारादरम्यानही महिला सन्मानावर भर देण्यात आला होता. निवडणूक प्रचारात महिलांना प्राधान्य देण्यात आलं असलं तरीही मंत्रिमंडळात जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेसला मतदान करण्यामागे महिला मतदारांचा समावेश असला तरीही त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला आमदाराची निवड करण्यात आलेली नाही. तीन मंत्री अनुसूचित जाती आणि जमातीचे, प्रत्येकी एक मंत्री आदिवासी, लिंगायत, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजातील निवडण्यात आले आहेत.
विधानसभेत फक्त चार टक्के महिला आमदार
कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण १० महिला आमदार निवडून आल्या आहेत. २२४ एकूण उमेदवारांपैकी १० महिला आमदार निवडून आल्याने हा आकडा फक्त ४ टक्के आहे. प्रत्येकी चार महिला आमदार काँग्रेसमधून आणि भाजपामधून, एक जेडीएसमधून आणि एक अपक्ष असे दहाच महिला आमदार यावेळेस कर्नाटकच्या विधानसभेत निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने एकूण ११ महिला उमेदवारांना तिकिट दिले होते. तर, भाजपाने १२ आणि जेडीएसने १३ महिला उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी दिली होती.
बोम्मई सरकारच्या मंत्रिमंडळातही केवळ एकच महिला मंत्री होती. आता सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास ही संख्याही एकवरच राहणार असल्याची शक्यता आहे. महिला आमदारांची संख्या विधानसभेत कमी असली तरी निवडून आलेल्या सर्व महिला आमदार उच्चविद्याविभूषित आहेत. तसंच, त्यांचं कार्यही तितकेच सक्षम आहे.
या महिला नेत्यांची नावे चर्चेत
काँग्रेसच्या निवडून आलेल्या चार महिला आमदारांपैकी लक्ष्मी हेब्बाळकर या सर्वांत ज्येष्ठ नेत्या आहेत. तसंच, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या त्या विश्वासू मानल्या जातात. अपक्ष महिला आमदार लता मल्लिकार्जुन सुद्धा काँग्रेसच्या जवळच्या आहेत. काँग्रेसच्या आमदार कनीझ फातिमा यांनी हिजाब बंदीविरोधात नेतृत्त्व केले होते. त्यामुळे त्याही लोकांच्या परिचयाच्या असून त्या गुलबर्गा येथून निवडून आल्या आहेत. अनुसूचित जाती समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नयना मोतम्माही उच्च शिक्षित आहेत. तर, एम रुपकला यांनीही कोलार गोल्ड फिल्ड्स येथून मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान, महिला नेतृत्त्वाला संधी देण्यासाठी काँग्रेस या महिला आमदारांचा विचार करू शकते, असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. तुर्तास पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात महिलांना संधी न दिल्याने अनेक स्त्रीवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.