जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. आज आर्थिक विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला असून अमेरिकेच्या क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २०२३ मध्ये नोबेल पुरस्कार पटकावणारी क्लॉडिया गोल्डिन या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. महिलांच्या श्रम बाजारातील परिणामांबाबत समज वृद्धिंगत केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“श्रम बाजारात महिलांची भूमिका समजून घेणे समाजासाठी महत्त्वाचे आहे. क्लॉडिया गोल्डिनच्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल धन्यवाद, आम्हाला आता भविष्यात कोणते अडथळे दूर करावे लागतील याबद्दल बरेच काही समजले आहे”, असे अर्थशास्त्रातील पुरस्कारासाठी समितीचे अध्यक्ष जेकोब स्वेन्सन म्हणाले.

स्त्री पुरुष यांच्यातील कमाईतील तफावत

नोकरीच्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्या कमाईत बरीच तफावत असते. शिक्षण आणि व्यवसायावरून कमाईतील हा फरक पूर्वी दाखवून दिला जायचा. परंतु यंदा आर्थिक विज्ञान पुरस्कार विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांनीच दाखवून दिलंय की, आता एकाच व्यवसायात असलेल्या स्त्री आणि पुरुष यांच्या कमाईतही तफावत आढळते. महिलेला पहिलं मूल झाल्यानंतर ही तफावत प्रकर्षाने जाणवते.

कोण आहे क्लॉडिया गोल्डिन

क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्या १९८९ ते २०१७ पर्यंत NBER (National Bureau of Economic Research) च्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्था विकास कार्यक्रमाच्या संचालकपदीही होत्या. तसंच, NBER च्या जेंडर इन द इकोनॉमी समूहाच्या त्या उपसंचालिकाही होत्या. क्लॉडिया गोल्डिन यांनी अर्थशास्त्रात अनेक संशोधन केलं आहे. महिला श्रम शक्ती, स्त्री-पुरुषांतील कमाईतील तफावत, नोकरीच्या ठिकाणी मिळणारे असमान उत्पन्न, शिक्षणसारख्या अनेक विषयांत त्यांनी अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे.

गोल्डिन यांचा अभ्यास काय सांगतो?

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेती आणि औद्योगिक समाजात बदल झाल्यामुळे विवाहित महिलांचा व्यवसायातील सहभाग कमी झाला. परंतु नंतर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सेवा क्षेत्र वाढल्यानंतर महिलांचा सहभागही वाढला. घर आणि कुटुंबासाठी असलेल्या महिलांच्या जबाबदाऱ्या आणि बदलेलेल सामजिक नियम यामुळे श्रम बाजारात महिलांचा सहभाग परिणामकारक ठरला, असं गोल्डिन यांनी स्पष्ट केलं आहे.

विसाव्या शतकात स्त्रियांमध्ये शिकण्याचं प्रमाण वाढत गेलं. त्यामुळे उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आता पुरुषांपेक्षा स्त्रीया अधिक शिकलेल्या आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे करिअर नियोजन केले गेले, यामुळे महिलांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्यात क्रांतीकारक बदल झाले, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

विसाव्या शतकात आधुनिकीकरण, आर्थिक वाढ आणि नोकरदार महिलांचे वाढते प्रमाण असूनही, महिला आणि पुरुष यांच्यातील कमाईत फारच तफावत आहे. गोल्डिनच्या मते, करिअर घडवणारे शैक्षणिक निर्णय तरुण वयात घेतले जातात. परंतु, त्यांचे निर्णय जर आधीच्या पिढींवर आधारित असतील तर स्त्रियांचा विकास लोप पावत जाईल. म्हणजेच, मूल जन्माला आल्यानंतर आई जर कामावर परतली नसेल तर तसाच निर्णय तिच्या पुढच्या पिढीतील महिलांकडून घेतला जाऊ शकतो, परिणामी महिला दिर्घकालीन करिअर ठरवू शकणार नाहीत.

नोबेल पुरस्काराविषयी

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा केली जाते. त्यानंतर १० डिसेंबर रोजी (आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी) नॉर्वेमधील ओस्लो, आणि स्वीडनच्या स्टॉकहोम या शहरांमध्ये बक्षीस वितरण सोहळे आयोजित केले जातात. औषध, भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांना पारितोषिकं वितरीत केली जातात. किंग कार्ल, राणी सिल्विया यांच्यासह जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पारितोषिकं वितरित केले जातात. तर ओस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक दिलं जातं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nobel for economic sciences to claudia goldin for having advanced our understanding of womens labour market outcomes sgk
Show comments