करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला जोरदार तडाखा बसला असताना त्याच वेळी ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवड्याचं दुसरं संकट देखील देशासमोर उभं राहिलं. या पार्श्वभूमीवर काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी केंद्र सरकारच्या एकूण धोरणावर टीका केली असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी भारतातील करोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची भूमिका मांडली आहे. “या सर्वच बाबतीत एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचं श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रीत केलं. कोविड-१९ चा प्रसार रोखण्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं आणि भारतात करोनाची ही परिस्थिती निर्माण झाली”, असं ते म्हणाले आहेत.

“आपल्या बलस्थानांकडे दुर्लक्ष”

याआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौची यांनी देखील भारतातील करोना परिस्थितीवरून परखड भूमिका मांडली होती. त्यानंतर आता अमर्त्य सेन यांनी देखील केंद्र सरकारच्या करोनाविषयक धोरणावर ताशेरे ओढले आहेत. “भारत औषध निर्मितीच्या बाबतीत समर्थ आहे. त्यामुळे भारत करोनाच्या साथीचा योग्य प्रकारे सामना करू शकला असता. मात्र, सरकारी पातळीवर असलेल्या संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रीत करू शकलो नाही”, असं ते म्हणाले. शुक्रवारी मुंबईत राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आपण जगाकडे लक्ष देत राहिलो!

दरम्यान, यावेळी बोलताना हार्वर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्र आणि तर्कशास्त्राचे प्राध्यापक असलेले अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर देखील आक्षेप घेतला. “केंद्र सरकार जागतिक स्तरावर आपली अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत राहिलं की भारत संपूर्ण जगाला वाचवेल. पण त्याचवेळी देशात कोविडची समस्या वाढण्यासाठी आणि लोकांना त्याचा विळखा बसण्याकडे दुर्लक्ष करत राहिलं. भारतात आधीच असलेल्या सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारी या समस्या कोविड साथीच्या काळात अजूनच गंभीर झाल्या आहेत”, असं ते म्हणाले.

“…म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!” डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

आजच्या आकडेवारीनुसार…

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात एक लाख २० हजार ५२९ नव्या करोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १५ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली आहे. तर देशात काल दिवसभरात एक लाख ९७ हजार ८९४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.३८ टक्के झाला आहे.

Story img Loader