नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटिश वैज्ञानिक पीटर हिग्ज (Peter Higgs Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गॉड पार्टिकलचा शोध लावल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या बोसोन सिद्धांताला संयुक्तपणे भौतिक शास्त्रातलं नोबेल मिळालं आहे. एडनबर्ग विद्यापीठाने एक इमेल करुन पीटर हिग्ज यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीटर हिग्ज हे पाच दशकांहून अधिक काळ आपलं योगदान देत होते. स्कॉटिश विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार पीटर हिग्ज यांनी ८ एप्रिलला दीर्घ आजाराने वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. एक महान शिक्षक, गुरु, तरुण शास्त्रज्ञांचे प्रेरणा स्थान असलेले पीटर हिग्ज यांचं निधन झालं आहे असं विद्यापीठाने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.

भौतिकशास्त्रामध्ये हिग्ज यांचं योगदान हे अनन्यसाधारण आहे. विश्व द्रव्यमान कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी संशोधन केलं. यातूनच त्यांनी विश्वातील काही मोठ्या रहस्यांपैकी एकाचा उलगडा केला. यामुळे हिग्ज यांना अल्बर्ट आईनस्टाईन आणि मॅक्स प्लँक यांच्या बरोबरीचं स्थान मिळालं.

पीटर हिग्ज यांनी बेल्जियन वैज्ञानिक फ्रँक्वा एंगलर्ट यांच्यासोबत मिळून १९६४ मध्ये ‘गॉड पार्टिकल’ (God Particle) याबाबतचा सिद्धांत मांडला होता. याच्या जवळपास पाच दशकांनंतर युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च येथील लार्ज हॅड्रॉन कोलाइडर येथे झालेल्या प्रयोगाने त्यांच्या सिद्धांताची पुष्टी केली. यासाठी या दोघांना २०१३ मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nobel laureate peter higgs who proposed existence of god particle dies at 94 scj