गेल्या काही दिवसांपासून नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. आतापर्यंत भौतिकशास्र, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. अशात आज शांततेचा नोबेल पुरस्कारही जाहीर झाला आहे. एका जपानी संस्थेला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीकडून सांगण्यात आलं आहे. या समितीने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.

निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार समितीने केलेल्या पोस्टनुसार यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थेनं हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी मोठं काम केलं आहे. जग हे अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था काम करते. त्यांच्या या कामाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हेही वाचा – Nobel Prize 2024 : व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार जाहीर; मायक्रो आरएनए शोधल्याबद्दल सन्मान

व्हिक्टर ॲम्ब्रोस-गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार

यापूर्वी नोबेल पुरस्कार समितीने भौतिकशास्र, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केले आहेत. अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन हे यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आला आहे. मायक्रो आरएनएच्या (microRNA) शोधाबद्दल व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला. भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा वापर करून ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया रचल्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या संशोधनामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) क्षेत्र विकसित होण्याला चालना मिळाली आहे.

हेही वाचा – Who is Han Kang : मानवी जीवनातील नाजूकपणा मांडणाऱ्या लेखिकेचा सर्वोच्च पुरस्कार, दक्षिण कोरियात साहित्यातील पहिला नोबेल मिळवणाऱ्या हान कांग कोण?

हान कांग यांना साहित्याचे नोबेल पुरस्कार

याशिवाय दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग (वय ५३) यांना गुरुवारी साहित्याचे नोबेल जाहीर झाले. ‘त्यांच्या हृदयाला भिडणाऱ्या काव्यात्मक गद्यांतून (पोएटिक प्रोज) इतिहासातील वेदना दिसतात. मानवी जीवन किती अस्थिर आहे, हे त्यातून व्यक्त होते,’ असे नोबेल समितीने म्हटले आहे.

नोबेल पुरस्कारांची सुरुवात कधी झाली?

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र/जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद करून ठेवली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी १९०१ सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. दरवर्षी १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो. गेली १२३ वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे. केवळ १९४० ते १९४२ या काळात यात खंड पडला होता. दुसऱ्या महायुद्धामुळे या तीन वर्षांमध्ये नोबेल पुरस्कार देता आले नव्हते.