यंदाच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या मौंगी जी. बावेंडी, कोलंबिया विद्यापीठाचे लुईस ई. ब्रूस आणि नॅनोक्रिस्टल टेक्नोलॉजी या संस्थेत काम करणारे अॅलेक्सी आय. एकिमोव्ह या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जाणार आहे. क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली.
यावर्षीच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी (३ ऑक्टोबर) हा पुरस्कार जाहीर झाला. अमेरिकेचे शास्त्रज्ञ पियरे अगोस्तिनी, जर्मनीचे फेरेन्स क्रॉज आणि स्वीडनच्या अॅनी एल. हुईलर यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या तीन शास्त्रज्ञांनी अॅटोसेकंदात इलेक्ट्रॉनचं जग पाहता येईल, अशी उपकरणं विकस्त केली आहेत. अॅटोसेकंद म्हणजे १/१,000,000,000,000,000 वा भाग. याद्वारे त्यांनी ब्रम्हांडाचं वय शोधून काढलं. ब्रह्मांडाचं वय जाणून घेण्यापासून ते आरोग्य तपासण्यांपर्यंत अनेक गोष्टींसाठी या तिन्ही शास्त्रज्ञांनी भरीव संशोधन केलं आहे.
हे ही वाचा >> “बावनकुळेंना सांगतो, अजून १० खासदार पाठवले तरी…”, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा
भौतिक आणि रसायनशास्त्रातील नोबेलची घोषणा करण्याआधी सोमवारी (२ ऑक्टोबर) यंदाचं पहिलं नोबेल पारितोषिक वैद्यक क्षेत्रासाठी जाहीर झालं. करोनावरील लस संशोधनात मोलाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ञ कॅटलिन करिको व ड्र्यु वेसमन यांना या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्विडनच्या कॅरिलोन्स्का संस्थेच्या नोबेल परिषदेकडून करिको व ड्र्यु वेसमन यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.