आम्हाला शांततेची नोबेल पारितोषिके मिळाल्याने मुलांच्या हक्कांसाठीचा लढा आणखी प्रबळ करण्याची संधी मिळाली आहे असे शांततेचे नोबेल विजेते भारतातील बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानची शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई यांनी सांगितले. पुरस्काराच्या पूर्वसंध्येला ते संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
सत्यार्थी यांनी सांगितले की, जर एक मूल धोक्यात असेल तर सगळे जग धोक्यात आहे. सत्यार्थी (६०) मलाला (१७) या दोघांना उद्या शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार असून ११ लाख अमेरिकी डॉलर इतकी पुरस्काराची रक्कम आहे. कोटय़वधी मुलांसाठी हे पारितोषिक महत्त्वाचे आहे ज्यांचे बालपण हिरावले गेले. येथे आपणाशी बोलत असताना लाखो मुलांना स्वातंत्र्य नाकारले जात आहे त्यांच्यासाठी काम करणे आवश्यक आहे.
जगात मुले प्राण्यांसारखी विकली जातात, त्यांच्यावर वेश्याव्यवसाय लादला जातो, ओलिस ठेवले जाते, त्यांना सैनिक बनवले जाते ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले. अभियंता असलेल्या सत्यार्थी यांनी नोकरी सोडून ‘बचपन बचावो’ आंदोलन सुरू केले. मलाला आपल्याला बहिणीसारखी आहे असे सांगून ते म्हणाले की, ती शूर मुलगी आहे. तालिबानच्या हल्ल्यातून ती बचावली व मुलींच्या हक्कांसाठी लढा दिला. मुस्लिमांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
इस्लामवर आमचा विश्वास आहे, तो शांततेचा धर्म आहे पण त्या धर्माविषयी लोकांना काही माहिती नाही अशी खंत तिने तालिबानी अतिरेक्यांचा उल्लेख करून व्यक्त केली.