एखादा शोध लागतो तेव्हा त्याचं मोल, त्यातील क्रांतीकारक क्षमता लगेच जाणवतेच असं नाही. १९७१मध्ये प्रा. ओ’कीफ यांना मेंदूतील ‘प्लेस सेल्स’ अर्थात आपल्या भोवतालच्या परिसराचा नकाशा मनात नोंदवणाऱ्या पेशींचा शोध लागला तेव्हा या शोधाची अशीच उपेक्षा झाली. मेंदूतील समुद्रघोडय़ाच्या आकारासारख्या भागांत या पेशी असून स्मृतीप्रक्रियेत त्यांचा वाटा मोठा असतो, असे ओ’कीफ यांनी शोधले होते.
मे-ब्रिट आणि एडवर्ड मूसर यांना २००५मध्ये या प्लेस सेल्स मेंदूतील ज्या भागात असतात त्यालगतच आणखीही काही पेशी अशा आढळल्या ज्या विशिष्ट स्थानी व्यक्ती गेल्यावर जागृत व कार्यरत होतात. याचाच अर्थ बाहेरचे स्थान आणि आपली स्मृती यांच्यात एक आंतरसंबंध आहे आणि आपल्या स्मृतीच्या आधारावर विशिष्ट स्थळी माणसातील भावना आणि विचार प्रवाहित होतात, असे या त्रयीला आढळून आले.
या संशोधनामुळे मेंदूतील विविध पेशींच्या गटांचे विविध प्रकारचे कार्य आणि त्यातील समन्वय यावर नवा प्रकाश पडला आहे. तसेच केवळ मेंदूच्या संशोधनालाच नव्हे तर तत्त्ववेत्ते आणि मानसशास्त्रज्ञ यांच्याही विचारांना नवी दिशा लाभणार आहे.
जॉन ओ’कीफ यांचा जन्म १९३९मधला असून एडवर्ड यांचा जन्म १९६२चा तर त्यांच्या पत्नी मे-ब्रिट यांचा जन्म १९६३चा आहे.