वृत्तसंस्था, स्टॉकहोम
दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग (वय ५३) यांना गुरुवारी साहित्याचे नोबेल जाहीर झाले. ‘त्यांच्या हृदयाला भिडणाऱ्या काव्यात्मक गद्यांतून (पोएटिक प्रोज) इतिहासातील वेदना दिसतात. मानवी जीवन किती अस्थिर आहे, हे त्यातून व्यक्त होते,’ असे नोबेल समितीने म्हटले आहे.

स्वीडिश अॅकॅडमीच्या नोबेल समितीचे कायमस्वरूपी सचिव मॅट्स माम यांनी पुरस्काराची घोषणा केली. नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ऑल्सन यांनी हान यांचे अभिनंदन केले आहे. स्त्रियांची असुरक्षितता, स्त्रियांचे जीवन यांच्याबद्दल कायमच हान सक्रिय असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘शरीर आणि आत्मा, मृत आणि यांना जोडणाऱ्या दुव्याची विशिष्ट अशी समज त्यांना आहे. त्याची मांडणी काव्यात्मक आणि प्रयोगात्मक शैलीतून करण्याचे त्यांचे तंत्र समकालीन गद्यांमध्ये अगदी नावीन्यपूर्ण असे आहे.’

हेही वाचा :काँग्रेस नेत्यांच्या वर्तनावर राहुल गांधी यांची नाराजी

‘हान या हृदयाला भिडणारे गद्यात्मक काव्याची मांडणी करतात. ते अतिशय नाजूक आणि प्रसंगी कठोर असते. काही वेळा ते अतिवास्तववादीदेखील असते,’ अशी प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठीच्या समितीच्या सदस्य अॅना कॅरिन पाम यांनी म्हटले आहे.

नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या हान या पहिल्या आशियायी महिला आणि दक्षिण कोरियातील पहिल्या महिला लेखिका ठरल्या आहेत. दक्षिण कोरियामध्ये नोबेल जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या आहेत. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष किम दाइ जंग यांना सन २००० मध्ये शांततेचा पुरस्कार मिळाला होता. दक्षिण कोरियामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.

कांग यांना त्यांच्या ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर सन्मान २०१६ मध्ये जाहीर झाला होता. एका महिलेच्या मांसाहार खाणे थांबविण्याच्या निर्णयाचे विचित्र परिणाम उलगडून सांगणारी ही कांदबरी आहे.

हेही वाचा :एकविसावे शतक भारत, ‘आसियान’चे, भारत-आसियान शिखर परिषदेत मोदींचे उद्गार

कांग १९९३पासून साहित्यक्षेत्रात

दक्षिण कोरियातील ग्वांग्जू शहरात १९७०मध्ये कांग यांचा जन्म झाला. लेखनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांचे वडील कादंबरीकार होते. त्यांनी सुरुवातीला कविता केल्या. नंतर कथेच्या माध्यमातून लिहायला सुरुवात केली. हान या १९९३ मध्ये कवयित्री म्हणून सर्वांसमोर आल्या. त्यांचा पहिला लघुकथासंग्रह १९९४मध्ये प्रसिद्ध झाला. १९९८ मध्ये त्यांनी ‘ब्लॅक डिअर’ ही पहिली कादंबरी लिहिली. ‘द व्हेजिटेरियन’, ‘ग्रीक लेसन्स’, ‘ह्युमन अॅक्ट्स’ आणि ‘द व्हाइट बुक’ यांचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले आहे. ‘वुई डू नॉट पार्ट’ हे त्यांची आगामी कादंबरी आहे.