उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. यावर नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्तर प्रदेशमधील ही घटना भारताच्या लोकशाहीवर कलंक असल्याचं मत कैलाश सत्यर्थी यांनी व्यक्त केलं. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

कैलाश सत्यर्थी म्हणाले, “बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केला. हा भारताच्या लोकशाहीवर कलंक आहे. ललितपुर पोलीस स्टेशनमधील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून संपूर्ण पोलीस स्टेशनवर कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांनी कृपया हा कलंक पुसण्यासाठी कठोर पावलं उचलावीत.”

कैलास सत्यर्थी यांच्या या ट्वीटवर ललितपूर पोलीस स्टेशनने एक व्हिडीओ निवेदन पोस्ट केले आहे. यात ललितपूर पोलीस अधीक्षक म्हणाले, “पाली पोलीस स्टेशनमध्ये एका बलात्कार पीडितेने पोलीस अधिकाऱ्यांकडून बलात्काराचा आरोप केला. यानंतर तात्काळ या घटनेची दखल घेऊन सहा पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं. या प्रकरणातील सर्व प्रकारचे पुरावे गोळा केले जात आहेत.”

“झाशीवरून न्यायवैद्यक प्रयोगशाळेचं पथक आलं आहे. ते पुरावे गोळा करत आहेत. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आलीय. या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात येईल,” असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

हेही वाचा : “उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद”, योगी आदित्यनाथ यांचा दावा

“पीडितेवर खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करण्याचा आरोप”

ललितपूर पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले, “पीडितेवर खोटे बलात्काराचे आरोप करून गुन्हे दाखल करण्याचे आरोप झाले आहेत. त्याबाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यावरही तपास सुरू आहे. तपासात जो निष्कर्ष समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.”

Story img Loader