123अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे विविध घटकांची सर्व शक्यतांनी जुळणी कशी करायची याविषयी करण्यात आलेल्या संशोधनाला यंदा जाहीर करण्यात आले असून त्यामुळे अनेक आर्थिक समस्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांची शाळांशी जुळणी करून प्रवेश प्रक्रियेतील अनेक प्रश्न सोडवता येतात. रुग्ण व अवयवदाते यांची जुळणी करून आरोग्यविषयक समस्या सोडवता येतात. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग हा विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळेत प्रवेश, टू-जी स्पेक्ट्रम लिलाव, कोळसा खाणी वाटप अशा आर्थिक व्यवहारात होऊ शकतो.
लॉइड शापले यांचे संशोधन
विविध जुळणी पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी शापले यांनी गेम थिअरीचा वापर केला आहे. दोन घटक त्यांच्या सध्याच्या जोडीदाराशिवाय दुसऱ्या कुठल्या घटकाला जुळणीत प्राधान्य देणार हे सांगू शकत नाहीत, त्यामुळे स्थिर जुळणी शक्य होत नाही पण शापले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल-शापले अलगॉरिथम शोधून काढला ज्यामुळे स्थिर जुळणी करता येते. यात संबंधित घटकाने जुळणी प्रक्रियेत बनवेगिरी करण्याच्या शक्यतेला आळा बसतो. शापले यांनी असे दाखवून दिले की, एखादी विशिष्ट बाजारपेठ संरचना बाजारपेठेतील एका किंवा दुसऱ्या घटकाला पद्धतशीरपणे कशी फायद्याची ठरू शकते.
अलविन रॉथ यांचे संशोधन
 शापले यांचे सैद्धांतिक निष्कर्ष हे प्रत्यक्ष व्यवहारात बाजारपेठेच्या कामकाजाचे स्पष्टीकरण कसे करू शकतात यावर रॉथ यांनी काम केले आहे. मूर्त संशोधनात रॉथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दाखवून दिले की, एखाद्या बाजारपेठ संस्थेचे यश हे स्थिरता या प्रमुख घटकावर अवलंबून आहे. त्यांनी प्रयोगशाळेतील संशोधनात त्याचे पुरावे दिले. सध्याच्या संस्थांमध्ये नवीन डॉक्टर्स व रुग्णालये यांची जुळणी, शाळा व विद्यार्थ्यांची जुळणी, अवयव दाते व रुग्ण यांची जुळणी यांची फेरसंरचना करण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. गेल-शापले यांच्या अलगॉरिथमच्या आधारे या संस्थात्मक सुधारणा शक्य झाल्या आहेत. विशिष्ट परिस्थिती, नैतिक र्निबध यांच्या अधीन राहून त्यांनी जुळणी केली आहे.
या दोघांनी स्वतंत्रपणे काम केले असले तरी ते एकमेकांना पूरक आहे. शापले यांनी मूलभूत सिद्धांत मांडला व त्याची प्रायोगिक सत्यता पटवण्याचे काम रॉथ यांनी केले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे बाजारपेठांची कामगिरी सुधारली आहे. आर्थिक अभियांत्रिकीतील उत्तम संशोधनाचे हे उदाहरण आहे.
पारंपरिक आर्थिक विश्लेषणात मागणी व पुरवठा समान प्रमाणात असेल अशा बाजारपेठांचा विचार केला जातो. पण प्रत्यक्ष अभ्यासात बाजारपेठ ही इतर अनेक परिस्थितीत व्यवस्थित काम करताना दिसते. काही परिस्थितीत आदर्श बाजारपेठ यंत्रणेला काही समस्यांना तोंड द्यावे लागते, तर काही वेळा अशी स्थिती येते की, किमतीच्या आधारे सर्व स्रोतांचे वाटप करता येत नाही. शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना टय़ूशन फी घ्यायची नाही. रुग्णांना अवयव दान करताना पैसे घ्यायचे नाहीत असे निकष असतील तर वाटप कसे करायचे, हा प्रश्न निर्माण होतो मग यात अतिशय प्रभावी अशी जुळणी किंवा वाटप कसे करता येईल याचा विचार करावा लागतो.
जोडीदारांची जुळणी
गेल व शापले यांनी अमूर्त व साधारण पातळीवर जुळणी प्रक्रियेचे विश्लेषण केले.  विवाह हे त्याचे एक उदाहरण त्यांनी घेतले. समजा दहा स्त्रिया व दहा पुरुष यांच्या जोडय़ा त्यांची व्यक्तिगत आवड लक्षात घेऊन लावायच्या आहेत. यात स्थिर जुळणीचे सूत्र काढण्यासाठी या जोडय़ा पुढे तुटणार नाहीत व नवीन जोडय़ा जुळवणार नाहीत ही अट आहे. त्याचे उत्तर गेल व शापले यांनी डेफरड अ‍ॅक्सेप्टन्स अलगॉरिथमने दिले. हा एक साधा नियम संच आहे ज्यामुळे स्थिर जुळणी करता येते.
यात एकतर पुरुष स्त्रियांना मागणी घालतील किंवा स्त्रिया पुरुषांना मागणी घालतील हे दोन पर्यायी मार्ग या अलगॉरिथममध्ये आहेत. जिथे स्त्रिया पुरुषांना मागणी घालणार आहेत त्यात प्रत्येक स्त्री तिला जो पुरुष आवडतो त्याला मागणी घालेल. त्यानंतर प्रत्येक पुरुष त्याला ज्यांच्याकडून मागणी आहे त्यांच्या प्रस्तावांचा विचार करील, त्यातील आकर्षक प्रस्ताव निवडेल पण तो स्वीकारणे लांबणीवर टाकेल व इतर स्त्रियांचे प्रस्ताव फेटाळेल. पहिल्या फेरीत ज्या स्त्रिया नाकारल्या गेल्या त्या दुसऱ्या पसंतीचे जोडीदार निवडतील पण पुरुष त्यांचा सर्वोत्तम पर्यायाचा मार्ग खुला ठेवतील व इतरांना फेटाळतील. ही प्रक्रिया कुठल्याही स्त्रीला पुढचा प्रस्ताव मांडावासा वाटणार नाही या पातळीपर्यंत चालू राहील. प्रत्येक पुरुषाने त्याने राखून ठेवलेला पर्याय निवडला तर प्रक्रिया संपेल. गेल व शापले यांनी दाखवून दिले की, या पद्धतीने स्थिर जुळणी शक्य असते. याच पद्धतीने नवीन डॉक्टर्स कामासाठी रुग्णालयांची निवड करू शकतात. विद्यार्थी शाळांची निवड करू शकता, रुग्ण अवयवदात्यांची निवड करू शकतात.
आर्थिकदृष्टय़ा जेव्हा एखादी वाटप प्रक्रिया केली जाते तेव्हा किंमत हा महत्त्वाचा घटक असतोच असे नाही. देकारांमध्ये किंमत हा महत्त्वाचा घटक असेल अशा मूळ मॉडेलचा गेल-शापले यांनी अभ्यास केला. किमतीच्या आधारे जुळणी ही लिलावांमध्ये केली जाते, त्यात वस्तू व ग्राहक यांची जुळणी होते.
इंटरनेटवरील लिलावाचे उदाहरण घेतले तर त्यात जाहिरातदारांसाठी जागेचा लिलाव केला जातो. या क्षेत्रातील कंपन्यांना गेल-शापले अलगॉरिथमचा वापर केल्याने फायदा झाला आहे. त्या कंपन्यांनी त्यांच्या लिलावाची संरचना करताना अर्थतज्ज्ञांचा सल्लाही घेतला होता. हेच तत्त्व आपण २ जी स्पेक्ट्रम किंवा कोळसा खाणी वाटप अशा व्यवहारात वापरू शकतो.   

जुळणी सिद्धांत
गेल-शापले अलगॉरिथम- वाटप यंत्रणेचे विश्लेषण हे अमूर्त कल्पनांवर आधारित असते. जर व्यवहारी लोकांना त्यांचे हित माहीत असेल व ते त्याप्रमाणे वागले तर त्यांना अर्निबध असा परस्पर व्यापार साध्य करता येतो त्यामुळे त्याची फलनिष्पत्तीही चांगली असते. जर तसे शक्य नसेल तर व्यक्तिगत पातळीवर नवी व्यापार संरचना शोधली जाते व ती त्यांची सधनता वाढवते. ज्या वाटपात व्यक्तिगत पातळीवर पुढील व्यापारात व्यक्तिगत पातळीवर कुणालाच फायदा होत नाही त्याला स्थिर जुळणी असे म्हणतात. सहकारी गेम थिअरीत स्थिरता ही मध्यवर्ती संकल्पना असते. गणिती अर्थशास्त्रातील गेम थिअरी ही व्यक्तींचा एक गट  सहकार्याच्या पद्धतीने वाटप कसे करू शकतो यांचे स्पष्टीकरण देते. हा सिद्धांत लॉइड शापले यांनी मांडला. १९६२ मध्ये त्यांनी ही संकल्पना डेव्हिड गेल यांच्या समवेत जोडीपद्धतीने जुळणीसाठी वापरण्याचा प्रयत्न केला. कोण चांगला जोडीदार असू शकेल यावर विविध व्यक्तींमध्ये मतभेद असतील जुळणी कशी करावी याचे उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

Story img Loader