किती वर्ष सत्ता मिळाली, हे महत्त्वाचे नसते. मिळालेल्या सत्तेमध्ये तुम्ही लोकांसाठी उपयोगी किती कामे केली, यावरच सत्ताधाऱयांच्या कार्याचे मोजमाप केले जाते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये केले. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी, अटल नागरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन (अमृत) आणि सर्वांसाठी घर योजनांची औपचारिक घोषणा गुरुवारी करण्यात आली. विविध राज्य सरकारांचे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत या योजनांची घोषणा करण्यात आली.
यावेळी मोदी म्हणाले, शहरे आणि गावांमध्ये संघर्ष निर्माण करणारा विकास निरुपयोगी आहे. त्यापेक्षा या दोन्हींमध्ये सहकार्य साधणारा विकास अधिक उपयुक्त आहे. लोकांच्या गरजेपेक्षा प्रशासनाने दोन पाऊले पुढे चालणे म्हणजेच स्मार्ट सिटी, अशी सोपी व्याख्या मोदी यांनी केली. सर्वसामान्य लोकांना केंद्रिभूत ठेवून कोणताही कार्यक्रम आखला तर त्याला फारसा विरोध होत नाही, असे सांगून ते म्हणाले, ज्या गोष्टी आपण करू शकतो, त्याच या योजनेच्या माध्यमातून पुढे घेऊन जायच्या आहेत. स्मार्ट सिटीसाठी कोणताही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांवर लादण्यात येणार नाही. शहरी विकासात स्पर्धा निर्माण केल्यास विकास अधिक परिणामकारक होऊ शकतो. आज सुरू करण्यात येणाऱया तिन्ही योजनांवर गेले काही दिवस सर्व स्तरांवर चर्चा करण्यात आली. एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी पहिल्यांदाच त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली, असे मोदी यांनी सांगितले.
आणीबाणीवर टीका
चाळीस वर्षांपूर्वी आजच्या दिवशी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यांच्या निर्णयावर टीका करून मोदी म्हणाले, केवळ सत्तेसाठी त्यावेळी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. आणीबाणीमुळे संपूर्ण देशाचा तुरुंग बनला होता. आज ४० वर्षांनंतर प्रत्येक नागरिकाच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे, असे मोदी म्हणाले. आणीबाणीवेळी मानवी हक्कांसाठी लढणाऱया जयप्रकाश नारायण यांचा स्मृतीनिमित्त स्मारक उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader