आसाम दौऱ्यावर असताना संघाच्या कार्यकर्त्यांनी मला मंदिरात जाण्यापासून रोखले, या राहुल गांधींच्या विधानावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. बारापेटामधील मंदिराच्या प्रमुखांनी राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल गांधी आरोप करतात त्याप्रमाणे त्यांना कोणताच विरोध झाला नाही. उलट आम्हीच मंदिराच्या प्रवेशद्वाराशी तब्बल चार तास त्यांची वाट पाहत होतो, असे मंदिराच्या प्रमुखांनी सांगितले. यावेळी आसामचे माजी मुख्यमंत्री भूमिंधर बर्मन आणि काँग्रेसच्या अनेक नेते मंदिराच्या परिसरात राहुल गांधींची वाट पाहत होते, ते माझ्याशी बोललेही. राहुल गांधी या परिसरातून दुसऱ्या मार्गाने निघून जाईपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहत होतो, असे मंदिराच्या प्रमुखांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला सांगितले.
राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मला एका मंदिरात जाण्यापासून रोखले, असा आरोप केला होता. आसाम दौऱ्यावर असताना बारापेटामधील एका मंदिरात मी जात होतो. त्यावेळी मंदिराबाहेरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी मला महिलांच्या मदतीने मंदिरात जाण्यापासून रोखले, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. हीच भाजप सरकारची काम करण्याची पद्धत आहे, असाही आरोपही यावेळी राहुल यांनी केला होता.

Story img Loader