Noida Law Student Suicide Case : उत्तर प्रदेश पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. या तरुणीवर एका युवकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. दोन दिवसांपूर्वी नोएडा येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत एका तरुणाने आत्महत्या केली होती. मृत तरुण हा नोएडातील एका खासगी विद्यापीठात विधी शाखेत शिकत होता. या तरुणाच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला (एक्स-गर्लफ्रेंड) अटक करण्यात आली आहे. ही घटना नोएडा शहरातील सेक्टर ९९ मधील सुप्रीम टॉवरमध्ये घडली आहे. मृत तरुणाचं नाव तपस असं असून तो मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबादचा रहिवासी होता. सुप्रीम टॉवरमधील एका फ्लॅटमध्ये तो दोन मित्रांबरोबर राहत होता.
मृत तपसच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपसच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला अटक केली आहे.
तपसने आत्महत्या केली तेव्हा त्याची एक्स-गर्लफ्रेंड तिथेच होती
तपसने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या घरात दोन्ही रूम पार्टनर्सबरोबर त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी देखील उपस्थित होती. तपसच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की तपस व त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी हे दोघेही विधी शाखेचे विद्यार्थी होते. अलीकडेच दोघांच्या नात्यात दूरावा आला होता. दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यानंतर दोघांचं नातं तुटलं (ब्रेक अप झालं). तपस त्यांचं नातं पूर्ववत (पॅच अप) करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तिने त्याला नकार दिला. तरुणीने तपसबरोबर जुळवून घेण्यास नकार दिला.
पोलिसांकडून सखोल तपास सुरू
दरम्यान, तपसच्या आत्महत्येनंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेचा सखोल तपास केला जात आहे. तपसने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या घरात किती जण उपस्थित होते? कोण कोण उपस्थित होते? त्यांच्यात काय बोलणं झालं? याबद्दल पोलीस चौकशी करत आहेत. सर्वांचे कबुलीजबाब नोंदवले जात आहेत. पोलीस तपसच्या मित्रांकडे देखील चौकशी करत आहेत. तपसचं त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीबरोबर म्हणजेच आरोपीबरोबरचे चॅट्स तपासत आहेत.