उत्तर प्रदेशातल्या नोएडा शहरातील एका हॉटेलमधील बाऊन्सर्सने ग्राहकांना मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. नोएडातल्या स्पेक्ट्रम मॉलमध्ये सर्व्हिस चार्जेसवरून (सेवा शुल्क) ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादातून एका कुटुंबाला बाऊन्सर्सने जबर मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही बाजूच्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एक कुटुंब नोएडातल्या स्पेक्ट्रम मॉलमधील ड्युटी फ्री रेस्तराँमध्ये पार्टी करायला गेलं होतं. पार्टी झाल्यानंतर सर्व्हिस चार्जवरून कुटुंबियांचा रेस्तराँमधील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की कर्मचारी आणि कुटुंबीयांमध्ये मारामारी सुरू झाली. परिणामी कर्मचाऱ्यांनी मॉलमधील बाऊन्सर्सना बोलावलं. त्यानंतर या बाऊन्सर्सनी कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.
बाऊन्सर्सच्या मारहाणीनंतर कुटुंबातील अनेक सदस्य जबर जखमी झाले आहेत. या कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांना सांगितलं की, आम्ही रेस्तराँमधील कर्मचाऱ्यांना सर्व्हिस चार्ज हटवण्यास सांगितलं होतं. परंतु तिथल्या कर्मचार्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे वाद झाला होता.
हे ही वाचा >> मनिषा कायंदेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “४० कोटींची फाईल…”
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ, दोन्ही बाजूच्या लोकांचे आरोप आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, हे कुटुंब स्पेक्ट्रम मॉलमधील ड्युटी फ्री रेस्टॉरंटमध्ये पार्टी करत होतं. पार्टीनंतर सर्व्हिस चार्ज देण्यावरून दोन्ही पक्षांत वादावादी आणि हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.