नोएडातील अनधिकृतरित्या बांधण्यात आलेले उत्तुंग ट्विन टॉवर्स आज स्फोटकांच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आले. ‘सुपरटेक’ या कंपनीच्या मालकीचे हे ट्विन टॉवर्स होते. या कारवाईमुळे या कंपनीचे तब्बल ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. कंपनीचे अध्यक्ष आर. के. अरोरा यांनी ही माहिती दिली आहे. “जमीन खरेदी, बांधकामावरील खर्च, विविध परवानग्यांसाठी यंत्रणांना देण्यात आलेले शुल्क आणि बँकेला दिलेले व्याज असा एकुण ५०० कोटींचा खर्च हे ट्विन टॉवर्स बांधण्यासाठी करण्यात आला होता” अशी माहिती अरोरा यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिली आहे.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे टॉवर्स प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या कारवाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. या कारवाईसाठी २० कोटींचा खर्च करण्यात आला. हे ट्विन टॉवर्स ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पाचा भाग होते. या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स होते. आठ लाख चौरस फुटांवर या टॉवर्सचं बांधकाम करण्यात आलं होतं.
‘एडिफाय इंजिनीअरिंग’ या कंपनीकडून हे बांधकाम पाडण्यात आले आहे. टॉवर्स पाडण्यासाठी या कंपनीला सुपरटेकडून १७.५ कोटींची रक्कम देणार येणार आहे. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवे लगत बांधण्यात आलेल्या या टॉवर्सची उंची १०० मीटर लांब म्हणजेच कुतुब मिनारापेक्षाची जास्त होती. या टॉवर्सचं पाडकाम हाती घेण्याआधी लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. टॉवर परिसराचा जवळपास ५०० मीटरचा भाग सील करण्यात आला होता.
या इमारतींमध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना त्यांनी भरलेले पूर्ण पैसे १२ टक्के व्याजासह परत करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. “रेसिंडेन्ट वेल्फेअर असोसिएशन”ला बांधकामादरम्यान झालेल्या त्रासासाठी २ कोटी देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.