Noida Woman Attempts to Murder Social Media Friend : नोएडामध्ये लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून एका महिलेने २१ वर्षांच्या तरुणावर हल्ला करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी महिला आणि पीडित तरुणाची सोशल मीडियावर सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. दरम्यान, या प्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी रबुपुरा पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहेत.
पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया नावाच्या महिलेशी पीडित तरुणाची सोशल मीडियावर मैत्री झाली होती. त्यांच्यामध्ये मैत्री झाल्यानंतर प्रिया पीडित तरुणाला ग्रेटर नोएडाला भेटायलाही आली होती. त्यानंतर पीडित तरुणाला २४ डिसेंबर रोजी प्रियाचा फोन आला होता. प्रियाने, तरुणाला भेटायला बोलावले. ते कारमध्ये असताना तिने पीडित तरुणाला जबरदस्तीने फळांचा रस प्यायला लावला. तो बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी महिलेने तिच्या दोन मैत्रिणींना बोलावले. यानंतर तिघींनी पीडित तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
ही सर्व घटना घडत असताना रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पीडित तरुण कारमध्ये बेशुद्धावस्थेत असल्याचे पाहिले आणि पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित तरुणाला ग्रेटर नोएडातील यथार्थ रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिया आणि अज्ञात साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस काय म्हणाले?
या सर्व प्रकरणावर बोलताना रबुपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, “मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी रात्री रोनिजा गावातील रहिवासी हंसराज यांनी एका महिलेने त्यांच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवली. त्यांनी सांगितले की, आरोपी आणि त्यांच्या मुलाची सोशल मीडियावर सहा महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. ती त्यांच्या मुलाला भेटायला ग्रेटर नोएडाला आली होती. ते कारमध्ये असताना महिलेने त्यांच्या मुलाला कशाचातरी रस जबरदस्तीने प्यायला लावला. त्यानंतर जो बेशुद्ध झाल्यावर आरोपी महिलेने तिच्या दोन मैत्रिणींना बोलवून त्याचा खून करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रांनी वार केले.”