आपले दैनंदिन जीवन अधिक सुखकर करू शकेल व पुढे चमत्कारिक वाटतील अशा गोष्टी साध्य करू शकेल अशा ग्राफिन या पदार्थाच्या संशोधनासाठी युरोपीय महासंघाने नोकिया या कंपनीला १.३५ अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे, नोकिया ही फिनलंडची मोबाईल फोन उत्पादक कंपनी असून गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर आहे. उच्च तंत्रज्ञान व सामाजिक परिणाम असलेल्या संशोधन विभागात नोकियाला युरोपीय समुदायाने ग्राफिनवर संशोधन करण्याची संधी दिली आहे. या प्रकल्पाचे संयोजन स्वीडनमधील गोथेनबर्ग येथील शालमर्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था करणार आहे. या संशोधनात एकूण ५६ दशलक्ष युरो खर्च केले जाणार असून एकूण १२६ संस्था व गट त्यावर काम करणार आहेत.
छोटय़ा ग्राफिनची मोठी गोष्ट
ग्राफिन हे कार्बनचे अत्यंत शुद्ध स्वरूप मानले जाते व त्याची जाडी एका अणूइतकी असते, त्याची मजबुती पोलादापेक्षा तीनशेपट अधिक असते. हिऱ्यापेक्षाही ग्राफिन कठीण असते. ग्राफिन हा कार्बनचा पातळ पापुद्रा असतो त्यात विद्युतवाहक गुणधर्म असतात. ग्राफिनच्या शोधासाठी २०१० मध्ये आंद्रे जेम व काँस्टंटाइन नोसोसेलोव या युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरच्या वैज्ञानिकांना नोबेल मिळाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोकिया कंपनी २००६ पासून ग्राफिनवर आधारित तंत्रज्ञानावर संशोधन करीत आहे. आधुनिक काळात ग्राफिनचा वापर दैनंदिन जीवनात कुठेकुठे करता येईल या दिशेने आमचे प्रयत्न राहतील.
हेन्री टेरी, नोकियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
ग्राफिनचे उपयोग
* इलेक्ट्रॉनिक्स, सौरउर्जा, वैद्यक व पाण्याचे नि:क्षारीकरण
* कधीही न मोडणारे मोबाईल
* कर्करोगाची औषधे शरीरात पोहोचवणारी वैद्यकीय उपकरणे
* ग्राफिन व धातू यांचा संयुक्त वापर केलेल्या वायर्स या सध्याच्या इंटरनेट केबल्सच्या खूपच वेगाने माहितीचे वहन करू शकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia gets the 1 35 billion dollers for grafin reserch