भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी बिगरकाँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्षांची ठोस तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबतचा निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्धात घेण्यात येईल, असे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
काँग्रेस आणि त्यांचे घटक पक्ष नरेंद्र मोदी यांना थोपविण्यात असमर्थ ठरणार आहेत. त्यामुळे भाजप आणि मोदी यांचा परिणामकारक मुकाबला केवळ बिगरकाँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्षच करू शकतात, असेही करात यांनी स्पष्ट केले.
माकप आणि अन्य डावे पक्ष विविध बिगरकाँग्रेस आणि बिगरभाजप पक्षांसमवेत या बाबत चर्चा करीत आहेत. अशा प्रकारची आघाडी निवडणुकांनंतर करण्यात आली होती. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर आम्ही त्यासंदर्भात चाचपणी करीत आहोत, असेही ते म्हणाले.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात १४ पक्ष एकत्र आले होते आणि आमची चर्चा सुरू आहे.
एमडीएमके-भाजप आघाडी?
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपसमवेत आघाडी करण्याबाबतची बोलणी करण्यासाठी वायको यांच्या नेतृत्वाखालील एमडीएमके पक्षाने चार सदस्यांच्या पथकाची नियुक्ती केल्याची घोषणा शनिवारी केली.
सदर पथकामध्ये आर. मसिलामणी, खा. ए. गणेशमूर्ती, इमायम जेबराज आणि एस. शेवंतीयप्पन यांचा समावेश असल्याचे पक्षप्रमुख वायको यांनी सांगितले.

Story img Loader