केरळच्या एका हिंदू मंदिरात भरतनाट्यम नृत्यांगणेला ती हिंदू नसल्याचं कारण देत एका कार्यक्रमातून वगळण्यात आलंय. त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजलकुडा येथील कूडलमणिक्यम मंदिरात हा प्रकार घडला. हे मंदिर राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या देवस्वोम बोर्डाच्या अंतर्गत आहे. ती हिंदू नसल्यामुळे मंदिराच्या आवारात तिला नियोजित कार्यक्रमात नृत्य करण्यापासून वगळण्यात आलं, असा आरोप भरतनाट्यम नृत्यांगणा मानसिया व्ही. पी. ने फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.
भरतनाट्यममधील पीएचडी रिसर्च स्कॉलर असलेल्या मानसियाला याआधी मुस्लिम म्हणून जन्माला आलेली आणि लहानाची मोठी झालेली असूनही शास्त्रीय नृत्याची कला सादर केल्याबद्दल इस्लामिक धर्मगुरूंच्या संतापाचा आणि बहिष्काराचा सामना करावा लागला होता.
तिच्या फेसबुक पोस्टमध्ये, मानसिया म्हणाली की “माझा नृत्याचा कार्यक्रम २१ एप्रिल रोजी मंदिराच्या परिसरात होणार होता. मंदिराच्या एका पदाधिकाऱ्याने मला कळवले की मी हिंदू नसल्यामुळे मी मंदिरात कार्यक्रम करू शकत नाही. तुम्ही चांगले नर्तक आहात की नाही याचा विचार न करता सर्व गोष्टी धर्माच्या आधारावर ठरवल्या जातात. संगीतकार श्याम कल्याणशी लग्न केल्यानंतर मी हिंदू धर्मात धर्मांतर केलं की नाही, असे प्रश्नही मला विचारले जात आहे. आता तरी माझा कोणताही धर्म नाही, त्यामुळे मी कुठे जावं,’’ असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
तिने सांगितले की, धर्मावर आधारित कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचा प्रकार तिच्यासोबत पहिल्यांदाच घडलेला नाही. कारण काही वर्षांपूर्वी तिला गुरुवायूर येथील गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात हिंदू नसल्याबद्दल मनाई करण्यात आली होती. “कला आणि कलाकार हे धर्म आणि जात यांच्यात गुंफले जातात. हा अनुभव माझ्यासाठी नवीन नाही. आपल्या धर्मनिरपेक्ष केरळमध्ये काहीही बदललेले नाही याची आठवण करून देण्यासाठी मी ते इथे फेसबुकवर अनुभव शेअर करत आहे,’’ असं ती म्हणाली.
इंडियन एक्सप्रेसने कूडलमानिक्यम देवस्वोम (मंदिर) मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मेनन यांच्याशी संपर्क साधला असता, मंदिराच्या विद्यमान परंपरेनुसार, मंदिराच्या आवारात केवळ हिंदूच पूजा करू शकतात. “हे मंदिर परिसर १२ एकर जागेवर आहे. १० दिवसांचा हा उत्सव मंदिराच्या परिसरात होणार आहे. या महोत्सवात सुमारे ८०० कलाकार विविध कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करणार आहेत. आमच्या नियमांनुसार, कलाकारांना ते हिंदू आहेत की नाही, हे विचारलं जातं. मानसियाने आपला कोणताही धर्म नसल्याचे लेखी दिले होते. त्यामुळे तिला कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आली. आम्ही मंदिरात सध्याच्या परंपरेनुसार तिला नकार कळवला आहे,” असं त्यांनी सांगितलं.