पीटीआय, सिमला : हिमाचल प्रदेशातील रोहरू येथे शनिवारी सकाळी अचानक आलेल्या पुरामध्ये एक वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा नातू अशा तिघांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्या तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रोशन लाल, त्यांची पत्नी भागा देवी हे एक धाबा चालवतात. त्यांचा नातू कार्तिक त्यांना भेटण्यासाठी आला होता. ओढय़ाला अचानक आलेल्या पुरामध्ये हा धाबा वाहून गेला आणि त्यात या तिघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोटखाई तालुक्यामध्ये बाजार भागातील रस्ता जवळपास एक मीटर इतका खचल्यानंतर तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. हिमाचल प्रदेशात शुक्रवारपासून मध्यम ते मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील ६५६ रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. हवामान खात्याने राज्यात शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तर २३ ते २६ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशाबरोबरच उत्तराखंडमध्येही ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या.

चमोली घटनेत तिघांना अटक

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात नमामी गंगे प्रकल्पावर विजेचा धक्का बसून १६ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. अभियंता हरदेवलाल आर्य, लाइनमन महेंद्र सिंह आणि स्थानिक पर्यवेक्षक पवन चामोला अशी तिघांची नावे असल्याची माहिती चमोलीचे पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोबाल यांनी दिली. त्यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरनाथ यात्रेत अडथळा

जम्मू-श्रीनगर महामार्गावर दोन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अमरनाथ यात्रा शनिवारी थोडा वेळ थांबवावी लागली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काश्मीरमधील तळछावणीमधील तीन हजारांपेक्षा जास्त यात्रेकरूंचा नवीन गट शनिवारी पहाटे यात्रेसाठी निघाला, मात्र त्यांना रामबनजवळ थांबावे लागले. मेहर आणि दलवास येथे ही दरड कोसळली होती. वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

प्रवाशांना वाचवण्यात यश

उत्तर प्रदेशात पुराच्या पाण्यात अडकलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून ४० प्रवाशांची सुटका करण्यात यश आले. ही बस उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेजवळून प्रवास करत असताना शनिवारी सकाळी कोतावली नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात फसली. भरपूर प्रयत्नांनी आधी प्रवाशांना वाचवण्यात आले आणि त्यानंतर बसदेखील बाहेर काढण्यात आली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.