नवी दिल्ली : उत्तर आणि ईशान्य भारत सोमवारी थंडीच्या लाटेने गारठला. धुक्याच्या दाट आवरणामुळे या भागातील दृश्यमानता कमी झाली. यातूनच उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात चार जण ठार झाले.
दिल्लीत सलग पाचव्या दिवशी थंडीची लाट कायम होती आणि धुक्यामुळे दृश्यमानता केवळ २५ मीटपर्यंत कमी झाली. राजधानीतील थंडीच्या लाटेची तीव्रता इतकी आहे, की सलग पाचव्या दिवशी हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमधील बहुतांश भागांपेक्षा या शहरात किमान तापमान कमी नोंदले गेले.
खराब हवामानामुळे एकूण २६७ रेल्वे गाडय़ा उशिराने धावत होत्या. पाच विमानांचे मार्ग बदलण्यात आले आणि ३० विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला, असे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असल्याने सोमवारी सकाळी एक बस समोरच्या मालमोटारीवर धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. ही बस गुजरातमधील राजकोट येथून नेपाळला जात होती. धुक्याची चादर पंजाब व लगतच्या वायव्य राजस्थानपासून हरयाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशमार्गे बिहापर्यंत पसरली असल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसून आले.