राजधानी दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी २० शिखर परिषदेमध्ये जगभरातल्या प्रभावशाली राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या परिषदेमध्ये रशिया-युक्रेन युद्धाविषयीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावर रशियासह सर्व सदस्य राष्ट्रांनी मंजुरीची मोहोर उमटवली. युक्रेन युद्धाचे जगावर झालेले परिणाम यात अधोरेखित करण्यात आले होते. मात्र, एकीकडे पुतिन यांनी या परिषदेला येणं टाळल्यानंतर आता ते रशियात उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग-उन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शस्त्रास्रांविषयी वाटाघाटी होणार असल्याची जोरदार चर्चा असल्यामुळे यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.
जपानी माध्यमांच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग-उन यांनी रविवारी प्योंगयांग स्थानकावरून त्यांच्या खासगी रेल्वेनं रशियाच्या दिशेनं आपला प्रवास सुरू केला. यावेळी किम जोंग-उन यांच्यासमवेत देशातील काही मोठे शस्त्रास्त्र निर्मिती करणारे उद्योगपती व उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्रीही होते. ही रेल्वे सोमवारी रशियातील खासान रेल्वे स्थानकात दाखल झाली. दक्षिण कोरियाच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अमेरिकेनं दिला होता इशारा!
अमेरिकेनं रशिया व उत्तर कोरिया यांच्यातील लष्करी वाटाघाटींना तीव्र विरोध केला होता. अशा प्रकारची कोणतीही चर्चा रशियानं उत्तर कोरियाशी करू नये, असा इशाराही अमेरिकेनं दिला होता. मात्र, तरीही किम जोंग-उन व व्लादिमिर पुतिन यांच्यात वाटाघाटी होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अमेरिकेच्या चिंता वाढू शकतात. युक्रेन युद्धात रशियाला शस्त्रटंचाईचा सामना करावा लागत असून त्यासाठी उत्तर कोरियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रखरेदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१२ वर्षांत किम जोंग-उन यांचे फक्त ७ विदेश दौरे!
दरम्यान, फारसे विदेश दौऱ्यावर न जाणारे किम जोंग-उन थेट रशियामध्ये पुतिन यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आपल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळात किम जोंग उन यांनी फक्त सात विदेश दौरे केले आहेत. त्यापैकी ४ दौरे त्यांचे मुख्य राजकीय मित्रराष्ट्र असणाऱ्या चीनचे केले आहेत. त्यामुळे त्यांच्या रशिया दौऱ्याची विशेष चर्चा होत आहे.