सेऊल :उत्तर कोरियाने रविवारी आणखी दोन लांब पल्ल्याची अण्वस्त्र वाहक क्षमतेची क्षेपणास्त्रे चाचणीच्या बहाण्याने डागली. जपानने चीन आणि उत्तर कोरियाविरुद्ध नवी अधिक आक्रमक सुरक्षा रणनीती अवलंबल्याच्या निषेधार्थ ही कृती उत्तर कोरियाने केल्याचे मानले जाते.
उत्तर कोरियाने दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंतचा पल्ला गाठणारी अधिक अद्ययावत, प्रभावी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे विकसित केल्याचे सांगताना त्यासाठी लागणारी महत्त्वाची चाचणी पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर रविवारी उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्र डागली. उत्तर कोरियाच्या वायव्य टोंगचांगरी भागातून ही दोन्ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ही क्षेपणास्त्रे सुमारे ५०० किलोमीटर (३१० मैल) पार करून उत्तर कोरिया व जपान दरम्यानच्या सागरी हद्दीत कोसळल्याची माहिती जपान, दक्षिण कोरियाच्या सरकारकडून देण्यात आली.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले, की ही दोन्ही क्षेपणास्त्रे एका उंच कोनात सोडण्यात आली होती. जर संभाव्य नियोजित मार्गाने ती डागली असती तर त्यांनी अधिक लांबचा पल्ला गाठला असता. उत्तर कोरियाकडून शेजारी देशांची हद्द टाळण्यासाठी मध्यम व लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची उच्च कोनात चाचणी घेतली जाते. उत्तर कोरियाने ऑक्टोबरमध्ये मध्यवर्ती श्रेणीचे क्षेपणास्त्र डागले होते. त्यामुळे जपानला आपल्या नागरिकांना धोक्याचा इशारा द्यावा लागला होता.
दक्षिण कोरियाकडून निषेध
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर दक्षिण कोरियाच्या उच्चस्तरीय सुरक्षा अधिकार्याची तातडीची बैठक झाली. त्यात उत्तर कोरियाकडून सतत आक्रमकपणे केल्या जाणाऱ्या चिथावणीखोर कृत्याचा निषेध करण्यात आला उत्तर कोरियात अन्नटंचाईमुळे भुकेने व थंडीने बेजार झालेल्या नागरिकांची दुर्दशा झाली असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी उत्तर कोरिया ही युद्धखोर पावले टाकत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका आणि जपानशी दक्षिण कोरिया त्रिपक्षीय सुरक्षा सहकार्य वाढवणार आहे.