सोल : उत्तर कोरियाने बुधवारी समुद्र किनाऱ्यावरून २३ क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे दक्षिण कोरियात हवाई हल्ल्याचा धोक्याचा इशारा देण्यात आला होता. या क्षेपणास्त्रांपैकी एक दक्षिण कोरियाच्या एका बेटाच्या दिशेने निघाले होते. मात्र, सुदैवाने ते दोन्ही देशांच्या सागरी सीमेलगत समुद्रात कोसळले. दक्षिण कोरियानेही प्रत्युत्तरादाखल त्याच सीमा भागात क्षेपणास्त्र डागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी काही तास आधी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासह अमेरिकेला धमकी दिली होती. सध्या सुरू असलेल्या दक्षिण कोरिया-अमेरिका लष्करी सरावाचा उत्तर कोरियाने निषेध केला. दोन्ही देशांना याची भयंकर किंमत मोजावी लागू शकते, असे सांगून उत्तर कोरियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली होती. मात्र, अमेरिकेने उत्तर कोरियाबद्दल शत्रुत्वाची भावना नसून, उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी आपण मित्रराष्ट्रांसह काम करत असल्याचे स्पष्ट केले.

दक्षिण कोरियाने म्हटले, की उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी आपल्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून एकूण २३ क्षेपणास्त्रे डागली. यापैकी एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या दिशेने आले होते. दक्षिण कोरियाने त्या बेटावरील नागरिकांना हवाई हल्ल्याचा इशारा दिला होता. परंतु हे क्षेपणास्त्र दोन देशांच्या सागरी सीमेजवळ समुद्रात कोसळले.  काही तासांनी दक्षिण कोरियाच्या सैन्याने या बेटावरील हवाई हल्ल्याचा इशारा मागे घेतल्याचे सांगितले.

उत्तर कोरियाकडून रशियाला दारूगोळा ; अमेरिकेचा आरोप

वॉिशग्टन : युक्रेनवरील हल्ल्यासाठी उत्तर कोरियाकडून रशियाला मुबलक प्रमाणात दारुगोळा पुरवला जात असल्याचा आरोप अमेरिकेने केला. मात्र याचा फायदा होणार नाही, कारण युक्रेनला केली जाणारी लष्करी मदत कायम राहील, असा दावाही करण्यात आला.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ता जॉन किर्बी म्हणाले की, ‘‘मध्य पूर्व किवा उत्तर आफ्रिकेमध्ये निर्यात केल्याचे दाखवून उत्तर कोरियातून गुप्त मार्गाने रशियाला मोठय़ा प्रमाणात दारूगोळा दिला जात आहे. याचा वापर युक्रेनमधील आक्रमणांसाठी करण्यात येत आहे. आमचे परिस्थितीवर लक्ष आहे. मात्र उत्तर कोरियाच्या मदतीनंतरही युद्धाचे चित्र बदलणार नाही,’’ असे सांगत युक्रेनला पाश्चिमात्य राष्ट्रांकडून होणारा शस्त्रास्त्र पुरवठा कायम राहील, असे संकत किर्बी यांनी दिले. उत्तर कोरियातून रशियाला पाठवला जाणारा दारुगोळा नेमका किती आहे आणि तो कोणत्या मार्गे पाठवला जात आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र आता ‘आत्मघातकी ड्रोन’ पुरवणाऱ्या इराणनंतर उत्तर कोरियाचीही रशियाला छुपी मदत होत असल्याचे समोर आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North korea fires 23 missiles one landing off south korean coast zws