उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. किम जोंग उन यांनी त्यांच्या सर्वोच्च जनरलला बडतर्फ केलं आहे. त्यानंतर लष्कराला आदेश दिले आहेत की युद्धासाठी तयार राहा. तसंच किम जोंग उन यांनी शस्त्रसाठा वाढवण्याचे आणि सैन्याने सतर्क राहण्याचेही आदेश दिले आहेत.

उत्तर कोरियाचं सरकारी चॅनल KRT ने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी केंद्रीय लष्कर आयोगाची बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी उत्तर कोरियाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी काय उपाय योजना करता येतील त्यावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी कुठल्याही शत्रू राष्ट्राचं नाव घेतलं नाही. मात्र लष्कराला सज्ज राहा असा इशारा दिला आहे.

KRT या वृत्तवाहिनीने एक फोटोही जारी केला आहे. या फोटोत किम जोंग उन हे दक्षिण कोरियाची राजधानी सियोल आणि त्या शेजारच्या ठिकाणांवर पॉईंट करताना दिसत आहेत. तिथल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाक सु इल यांना जनरल पदावरुन हटवून री योंग गिल यांची नवे जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाक सु इल यांना का हटवण्यात आलं याचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र आता री योंग गिल यांना जनरल करण्यात आल्याने ते संरक्षण मंत्री या पदावर राहणार नाहीत.

एका अहवालानुसार किम जोंग उन यांनी शस्त्रांची निर्मिती वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. मागच्याच आठवड्यात किम जोंग उन यांनी शस्त्रांच्या कारखान्याचाही दौरा केला. मिसाइल इंजिन, तोफखाने आणि इतर हत्यारं यांचं उत्पादन वाढवा असे आदेश त्यांनी दिले आहेत.युद्धाशी संबंधित सर्व गोष्टींसाठी तयार राहा. तसंच अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज राहा असंही किम जोंग उन यांनी सांगितल्याचं कळतं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.