मागील जवळपास २० महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यामुळे दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. दोन्ही देशात संघर्ष सुरू असताना आता उत्तर कोरियाने या युद्धात उडी घेतली आहे. उत्तर कोरियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी रशियाला घातक शस्त्रे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आगामी काळात रशिया-युक्रेन संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने ‘सीबीएस न्यूज’ला सांगितलं की, उत्तर कोरियाने रशियाला शस्त्रास्त्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याला बळ दिलं जात आहे. मात्र शस्त्रांच्या आणखी किती खेपा केल्या जाणार आहेत? हा पुरवठा कायम राहणार का? किंवा या शस्त्रांच्या बदल्यात उत्तर कोरियाला काय मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता आली नसल्याचं अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे रशियाच्या दौऱ्यावर आले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यासाठी त्यांनी रेल्वेनं प्रवास केला होता. यामुळे युक्रेन आणि इतर मित्रपक्षांनी चिंता वाढली. या भेटीनंतर आता उत्तर कोरियाच्या सीमेवरील तुमांगंग रेल्वे स्थानकावर लष्करी हालचालींना वेग आला आहे. येथे ७० हून अधिक मालवाहक डबे उभे आहेत. यामधून रशियाला शस्त्रांची निर्यात केली जात असल्याचं बोललं जात आहे.

खरं तर, अलीकडेच अमेरिकेनं इराणमधून जप्त केलेली शस्त्रे युक्रेनला हस्तांतरीत केली होती. यानंतर उत्तर कोरियाने रशियाला शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली आहे. घातक शस्त्रे घेऊन जाणारी एक खेप आधीच रशियात पोहोचली असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या घडामोडीनंतर जगाची चिंता वाढली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North korea provide artillery to russia for ukraine war vladimir putin kim jong un meeting rmm
Show comments