उत्तर कोरियाने गुरुवारी अधिकृतपणे करोनाचा रुग्ण सापडल्याची माहिती दिली आहे. यानंतर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्योंगयांगमध्ये करोनाचा उपप्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. ओमायक्रॉन जास्त संसर्गजन्य असल्याने उत्तर कोरियाने लॉकडाउन जाहीर केला आहे.

अधिकाऱ्याने KCNA न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, “फेब्रुवारी २०२० पासून म्हणजेच गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही सुरक्षा ठेवली होती. पण आता त्या सुरक्षेला तडा गेला आहे आणि देशात मोठी आणीबाणीची घटना घडली आहे”.

रिपोर्टनुसार, प्योंगयांगमधील काही लोक ओमायक्रॉनच्या संपर्कात आले होते. यावेळी लोकांची नेमकी संख्या किंवा कोणत्या माध्यमातून त्यांना संसर्ग झाला याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. ८ मे रोजी संसर्ग झालेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यात आले होते.

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांनी करोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. किम जोंग यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात कडक लॉकडाउन लावण्याचे आदेश दिले आहेत. तसंच राखीव वैद्यकीय पुरवठा एकत्रित करण्यास सांगितलं असल्याचं वृत्त KCNA ने दिलं आहे.

उत्तर कोरियाने आपल्या देशात करोनाचा रुग्ण सापडल्यासंबंधीची माहिती याआधी कधीच जाहीर केलेली नाही. यावर दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमधील अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली होती. खासकरुन शेजारी राष्ट्र दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असताना ही शंका व्यक्त करण्यात आली होती.

याआधी चीनमधील स्थानिक वृत्तवाहिनीने उत्तर कोरियाने लोकांना ११ मे पर्यंत घराबाहेर न पडण्यास सांगितलं असल्याचं वृत्त दिलं होतं. फ्लूची लक्षणं असल्याने हा आदेश आहे सांगताना चीनने करोनाचा उल्लेख टाळला होता.

Story img Loader