उत्तर कोरियाचे संस्थापक किम संग यांच्या जन्मदिनाच्या पाश्र्वभूमीवर दक्षिण कोरियात झालेल्या निदर्शनाच्या वेळी उत्तर किम संग, त्यांचा मुलगा किम जाँग आणि विद्यमान नेता किम जाँग ऊन यांचे फोटो जाळल्यामुळे उत्तर कोरियाने संताप व्यक्त केला आहे. दक्षिण कोरियाने आपल्या देशाविरोधातील कारवाया बंद केल्या नाही तर कोणत्याही क्षणी हल्ला करू, असा निर्वाणीचा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले असतानाच उत्तर कोरियाने नव्याने युद्धाचा इशारा दिल्यामुळे तणावात भर पडली आहे.
दक्षिण कोरियात सोमवारी झालेल्या निदर्शनांच्या पाश्र्वभूमीवर उत्तर कोरियाने संताप व्यक्त केला आहे. दक्षिण कोरियाने आपल्या विरोधातील कारवाया थांबवून माफी मागितली नाही तर कोणताही इशारा न देता आक्रमण केले जाईल, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. दक्षिण कोरियातील कठपुतली प्रशासनाला खरोखरच चर्चा करायची असेल तर त्यांनी प्रथम माफी मागावी, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या धमकीचा निषेध केला आहे. आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उत्तर कोरियाचे संस्थापक किम संग यांच्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर उत्तर कोरिया आणखी दोन क्षेपणास्रांची चाचणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत उत्तर कोरियाने अशा प्रकारच्या चाचण्या करणे मोठी चूक ठरेल, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री केरी यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा