North Korea Vs South Korea : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यातच इस्त्रायलने लेबनॉनमधील हेजबोलावर हल्ले केल्यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. यातच आता उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये तणाव वाढला आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी एकमेकांना युद्धाची धमकीव दिल्यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची परिस्थिती आहे.

दरम्यान, दक्षिण कोरियाबरोबरच्या सर्व सीमा उत्तर कोरियाने पूर्णपणे बंद करण्याची घोषणा उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी केली आहे. तसेच उत्तर कोरियाच्या सैन्याने सांगितलं आहे की, दक्षिण कोरियाकडे जाणारे सर्व रस्ते आणि रेल्वे मार्ग बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Nawaz Sharif : “मोदी SCO परिषदेसाठी पाकिस्तानला आले असते तर…”, नवाझ शरीफ यांची साद; देशातील गंभीर परिस्थितीचा उल्लेख करत म्हणाले…

दोन्ही देशात नेमकी वाद काय?

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हवाई हद्दीचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे. याबरोबरच उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग या शहरात दक्षिण कोरियाने ड्रोनच्या माध्यमातून पत्रके टाकल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. त्यानंतर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनच्या बहिणीने दक्षिण कोरियाला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.

दक्षिण कोरियाने काय म्हटलं?

उत्तर कोरियाने केलेले सर्व आरोप दक्षिण कोरियाने फेटाळून लावले आहेत. तसेच जर उत्तर कोरियाने काही चुकीचा निर्णय घेतला किंवा चुकीचे पाऊल उचलले तर दक्षिण कोरिया देखील चोख प्रत्युत्तर देऊल असा इशारा दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला दिला आहे. दरम्यान, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाबरोबरचे संबंध तोडण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे उत्तर कोरियाने रस्ते उद्ध्वस्त केल्यानंतर प्रत्युत्तर देत दक्षिण कोरियानेही दक्षिण सीमेवर गोळीबार केल्याचं दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने सांगितलं.